

मालवणातील व्यावसायिक शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या भेटीला ; आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले
वाळू लिलाव लवकरात लवकर जाहीर करण्याच्या आ. राणेंच्या सूचना ; अधिकाऱ्यांच्या “हप्तेखोरी” वर नाराजी
मालवण | कुणाल मांजरेकर
ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी महसूल विभागाकडून वाळू लिलाव जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे वाळू व डंपर व्यावसायिक आर्थिक मेटाकुटीला आले आहेत. यात भर म्हणून महसूल खात्यातील काही अधिकारी व कर्मचारी हप्तेखोरी करून व्यावसायिकांना त्रास देत असून मालवण तालुक्यातील वाळू व डंपर व्यवसायिकांनी शुक्रवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीच्या अनुषंगाने दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून वाळू व डंपर व्यावसायिकांची कैफियत मांडली. यावर आ. निलेश राणे यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत येथील वाळू लिलाव लवकरात लवकर लावण्याची सूचना केली. तसेच महसूल अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीबाबत आमदार निलेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मालवण तालुक्यातील वाळू तसेच डंपर व्यावसायिक यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची भेट घेतली व व्यवसायातील अडचणी, रखडलेली वाळू टेंडर प्रक्रिया तसेच टेंडर प्रक्रिया गतिमान होण्यासाठी प्रशासनाकडून न मिळणारे सहकार्य या बाबत भूमिका मांडली. दत्ता सामंत यांनी व्यवसायिकांचे म्हणणे ऐकून घेत आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधला व व्यवसायिकांच्या असलेल्या समस्या त्यांच्याकडे पोहोचवल्या. दरम्यान आमदार निलेश राणे यांनी व्यावसायिकांचे जे काही प्रश्न असतील, प्रशासन स्तरावर ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याची ग्वाही दिली आहे. आमदार निलेश राणे दोन दिवसात मालवण दौऱ्यावर येणार असून यावेळी व्यावसायिक त्यांची भेट घेणार आहेत.
यावेळी शिवसेना शहर संघटक राजू बिडये यांच्यासह संजय वराडकर, प्रणय कांबळी, मंदार कांदळकर, कौशल गवंडी, शुभम रेवंडकर, बंटी पेडणेकर, समीर मेथर, स्वप्नील सावंत, रोहन मयेकर, अमित कांबळी, प्रसाद परुळेकर, अमोल चव्हाण, आप्पा चव्हाण, शेखर वाक्कर, सागर भोगवेकर, शाम वाक्कर, बंटी चव्हाण, बाबू चव्हाण, संतोष सातार्डेकर, सुयश गावडे, राहुल गोलतकर, स्वप्नील देऊलकर, यश सक्रु, केदार कवटकर, ऋषी आसोलकर, सुशील शेडगे, सचिन मराठे, सिद्धेश परब, ओम कांबळी, सुयश गावकर, हेमंत चव्हाण, राजा सावंत, प्रशांत परब आदी उपस्थित होते.



Subscribe to my channel




