गणेश मंडळांतून आता सरकारी योजनांचा थेट लोकसंवाद…

१६ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘लोकसंवाद-२०२६’; शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत

मुंबई : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने अभिनव पाऊल उचलले आहे. १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळांना जनजागृतीचे प्रभावी व्यासपीठ बनविण्यात येणार आहे. प्रमुख आणि मानाच्या गणेश मंडळांच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांतून शासकीय योजनांची माहिती, पात्र लाभार्थ्यांना मार्गदर्शन आणि नागरिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे.

कृषीपासून आरोग्यापर्यंत योजनांची माहिती‘

लोकसंवाद-२०२६’मध्ये कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन, सार्वजनिक आरोग्य, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण यासह विविध शासकीय विभाग सहभागी होणार आहेत. शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, शेततळे, कृषी औजारांसाठी अनुदान, महिला बचत गट, उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांसह विविध आरोग्य सुविधांची माहितीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

युवकांसाठी रोजगार व कौशल्य योजनांवर विशेष भर

युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती यांच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार आणि ‘आपले सरकार’ यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.

अधिकारी थेट गणेश मंडळात; नागरिकांशी साधणार संवाद

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ माहितीपत्रके वाटण्यापुरता हा उपक्रम मर्यादित राहणार नाही. स्थानिक क्षेत्रीय अधिकारी, जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ गणेश मंडळांच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे व मार्गदर्शन देणार आहेत. कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, सहकार, पणन, कौशल्य विकास, सामाजिक न्याय आणि पोलीस विभागासह विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

फेसबुक-युट्यूब लाईव्हमधूनही जनजागृती

प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहता न येणाऱ्या नागरिकांपर्यंतही माहिती पोहोचावी यासाठी शक्य त्या ठिकाणी कार्यक्रमांचे फेसबुक किंवा युट्यूब लाईव्ह करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर #गणेशोत्सव२०२६ आणि #लोकसंवाद२०२६ या हॅशटॅगचा वापर करण्यात येणार आहे.

गणेश मंडळांना सहभागाचे आवाहन

‘लोकसंवाद-२०२६’मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश मंडळांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा. मुंबई शहर व मुंबई उपनगरातील गणेश मंडळांनी माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई येथे संपर्क साधावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागाने केले आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहासोबतच सरकारी योजनांची माहिती थेट घराघरात पोहोचविण्याचा हा उपक्रम ठरणार असून, नागरिक आणि शासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यावर ‘लोकसंवाद-२०२६’चा भर असणार आहे.

error: Content is protected !!