ओसरगाव टोलवसुली विरोधात काँग्रेस आक्रमक, टोलनाक्यावर धडक 

महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवण्याची मागणी ; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही निवेदन

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोलनाक्यावरून स्थानिक वाहनधारकांकडून टोलवसुली करण्यास सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्ण असताना टोलवसुली सुरू करणे अन्यायकारक असून, महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली पूर्णपणे बंद ठेवावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांनाही काँग्रेसने याबाबत निवेदन सादर केले आहे.

मुंबई-गोवा महामार्ग खारेपाटण,कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा मार्गे गोव्याला जोडला जातो. या महामार्गावर ओसरगाव येथे महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून टोलनाका उभारण्यात आला असून, आयआरबी कंपनीकडून सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी सकाळी टोलवसुली सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. याची माहिती मिळताच जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टोल कार्यालयात जाऊन व्यवस्थापनाकडे विचारणा केली. त्यावेळी संबंधित व्यवस्थापनाकडून ही केवळ ‘ट्रायल’ असल्याचे सांगण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

यानंतर मंगळवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला पूर्वसूचना देत ओसरगाव टोल कार्यालयात जाऊन टोलवसुलीबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील वाहनधारकांवर टोलचा आर्थिक भार लादू नये, तसेच महामार्गाची कामे पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली सुरू करू नये, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. यावर टोल व्यवस्थापनाने सध्या टोल सुरू करणार नसल्याचे तोंडी सांगितले असून, आठवडाभरात लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती काँग्रेसने दिली.

‘महामार्ग अपूर्ण असताना टोल कशासाठी?’

मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी अद्याप कामे अर्धवट आहेत. काही भागांत रस्त्याची दुरवस्था झाली असून महामार्ग पूर्णत्वास गेलेला नसताना स्थानिक नागरिकांकडून टोलवसुली करणे योग्य नाही, असा काँग्रेसचा आक्षेप आहे. यापूर्वीही जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासनाकडे महामार्गाची कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली करू नये आणि टोलनाका जिल्ह्याच्या वेशीवर हलवावा, अशी मागणी करण्यात आल्याचे मोंडकर यांनी सांगितले.

ओसरगाव हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथून वारंवार ये-जा करणाऱ्या स्थानिक वाहनधारकांना प्रत्येक वेळी टोल भरावा लागल्यास त्यांच्यावर मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे हा टोलनाका जिल्ह्याच्या वेशीवर नेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न

गणेशोत्सव जवळ येत असताना टोल कर्मचारी आणि स्थानिक वाहनधारकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे. धार्मिक सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार असल्याने टोलवसुलीच्या मुद्द्यावरून नागरिक आणि टोल व्यवस्थापन यांच्यात संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

महामार्ग प्राधिकरण तसेच टोलवसुली करणाऱ्या आयआरबी कंपनीला महामार्गाची कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवण्याच्या सूचना द्याव्यात आणि स्थानिक वाहनधारकांवरील आर्थिक अन्याय दूर करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेसने पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी तसेच टोल व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्यासह प्रकाश जैतापकर, देवानंद लुडबे, बाळू मेस्त्री, अतिश जेठे, जेम्स फर्नांडीस, महेश परब, सरदार ताजर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!