मालवणात शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल : आ. निलेश राणेंची उपस्थिती

निलेश राणे शांत होता, पण तुम्ही नको त्याच्या नादाला लागलात : आ. राणेंचा सूचक इशारा

मालवण शहरात गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार ; मालवण नगरपालिकेचा विजय राणेसाहेबांना भेट म्हणून देणार

नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व २० ही जागा निवडून आणणारच, कुठेही कमी पडणार नसल्याचा दिला विश्वास

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेने भव्य शक्तीप्रदर्शन करून नगराध्यक्ष पदासाठी सौ. ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व २० उमेदवारांचे अर्ज दाखल केले. निलेश राणे शांत होता, पण तुम्ही नको त्याच्या नादाला लागला, असा सूचक इशारा आ. राणे यांनी यावेळी दिला. मालवण शहरात गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार असून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व २० ही जागा निवडून आणणारच, कुठेही कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले.

शिवसेना उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना प्रचार कार्यालयात आयोजित जाहीर सभेत आमदार राणे बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती न होण्यास काय काय घडले याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी व्यासपिठावर शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उमेश नेरूरकर, राजन सरमळकर, दादा साईल, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, दिपलक्ष्मी पडते, काका कुडाळकर, संजय पडते, बबन शिंदे, राजा गावडे, राजा गावकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, बाळू तारी तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळू कुबल, दत्ता सामंत, महेश कांदळगावकर यांनीही आपले विचार मांडले.

यावेळी आ. निलेश राणे म्हणाले, जे करायचे ते जिद्दीवर ही शिकवण आणि संस्कार आमच्यावर आहे. यामुळे मालवण नगरपालिकेची ही निवडणूक आम्ही लढणार आणि जिंकणार तेही जिद्दीवर. तुम्ही कोणला थकवायला बघता आम्हाला. प्यादाच वजीर होवू शकतो, वजीर प्यादा होवू शकत नाही. बुद्धीबळाचा खेळ मला माहिती आहे. हे हत्ती, घोडे या सगळ्यांना बाजूला करणार आणि हा प्यादा वजीरच होणार आहे. तुम्ही नको तेच्या नादाला लागलात. निलेश राणे शांत होता आणि मालवणच्या लोकांसाठी शांतच राहणार आहे. या शहरासाठी शांत राहणार आहे. पण अंगावर आलात तर नाही सोडणार. काहींना वातावरण बिघडवायचं आहे, तुम्ही बिघडू देऊ नका. या शहरात गुलाल आणि फटाके आपलेच उडणार आहेत. या शहराची सेवा करण्यासाठी आपल्याला जनता मतदान करणार आहे, असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, निवडणूक चांगल्या वातावरणात आणि महायुतीमध्ये व्हावी कोणत्याही कार्यकर्त्याचे नुकसान होवू नये त्याच्यावर कोणतेही दडपण येवू नये यासाठी माझा प्रयत्न होता. मी स्वतः दोन पराभव बघितलेले आहेत यामुळे कार्यकर्त्यांना त्रास होवू नये यासाठी मी युतीसाठी प्रयत्न करत होतो. विजयाची टांगती तलवार कार्यकर्त्यांवर असू नये यासाठी जीवापाड प्रयत्न केले. जे माझ्या स्वभावात बसतनाही, मला पटत नव्हतं तरीही माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी सातत्याने प्रयत्न करत होतो, पण प्रयत्न काही यशस्वी झाले नाहीत. काहींना युती व्हावी अशी इच्छा होती, तर काहींना युती नको होती. राजकारणामध्ये कार्यकर्त्यांच्या भरवशापेक्षा काहींचा इगो महत्वाचा आणि मोठा असतो. हा इगो आम्ही कधीच केला नाही, ही निवडणूक आमची नाही कार्यकर्त्यांची निवडणुक आहे. ही जी निवडणूक कार्यकर्त्यांची होती, ते सहज जिंकले असते तर दुखः ते कोणाल होते. खासदार नारायण राणे यांची इच्छा होती, युती व्हायला हवी. राणेंचा मान शिवसेना ठेवणार आहे, असेही श्री. राणे म्हणाले.

राणे पुढे म्हणाले की, खासदार नारायण राणे यांचा जीव आहे मालवणवर. ते नेहमी म्हणतात मला ओळख मालवणने दिली. मी एवढे प्रयत्न करूनही जर कोणी युती करत नसतील तर कशाला युती करायची नव्हती ते निवडणुकीतून तुम्हाला सगळं कळेल. घमेंड, फुकटचा आत्मविश्वास इगो कोणासाठी ? यामुळेच आज महायुतीतील घटक पक्ष समोरासमोर उभे आहेत. आपल्या उमेदवारांसाठी मी वेळोवेळी वाकलो, मी त्यांच्याकडे शरण गेलो, काही लोकांना कार्यकर्त्यांचे सुख आणि दुखः कळत नसेल तर आता त्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे. कोणतीही तडजोड करायची नाही. ही खासदार नारायण राणेंची निवडणूक आहे आणि खासदार राणेंचा आशिर्वाद आमच्या मागे आहे. मी त्यांचा आशिर्वाद घेऊन आलेलो आहे. राणे साहेबांचा शब्द पडू देणार नाही, मालवण नगरपालिका राणे साहेबांना भेट म्हणून देणार आहे. कारभार कसा असतो, लोकांना कसा कारभार हवा आहे, आम्ही लोकांवर कारभार लादणार नाही लोकांना जे अभिप्रेत आहे जे हवं आहे त्यादृष्टीने काम करणार आहे असेही श्री. राणे म्हणाले.

श्री. राणे पुढे म्हणाले की, नको त्या लोकांच्या हातात मालवणचा कारभार देऊ नये. काही लोकांचे उदरनिर्वाहाचे साधनच म्हणजे नगरपालिका आहे. नगरपालिका हे एक मंदिर आणि पवित्र स्थान आहे. त्याठिकाणी पवित्र लोकच गेले पाहिजे. आमचे सगळे उमेदवार अतीशय पारदर्शक निष्कलंक आणि एकही भ्रष्टाचाराचा डाग नसलेले उमेदवार आहेत. शहर आपल्याला जपायचे आहे. राणे साहेबांनी जसं शहर जपलं तसेच मला जपायचं आहे. मला तुमचे प्रेम आणि विश्वास हवा आहे. या शहराचा विकास शिवसेनाच करू शकते. मी कुठल्याही टिकेला उत्तर दिलेले नाही. ज्यांना मी शहर अध्यक्ष केले, आज ती माझ्यावर माझ्या पक्षावर टिका करत आहेत. चार देतो म्हणताहेत तुमचे चारही येणार नाहीत. चारपण येऊ द्यायचे नाही. येणार तर २१ आमचेच शिवसेनेचेच यायला हवेत आणि येणारच. काय बोलतो, कोणासमोर बोलतो, दुपारी माझ्याबरोबर बोलायचे आणि संध्याकाळी प्रेस घ्यायची. त्यांचे बोलाविता धनी वेगळा आहे. त्यांचा जीव केवढा काय बोलणार आहेत, बोलूच शकत नाहीत. हे काय चाललं आहे, हे मला माहिती आहे. त्रास कोणाचा निलेश राणेंचा आहे ना, निलेश राणेंची रेषा वाढते आहे याचा त्रास आहे हे मी समजतो. मी प्रामाणिकपणे काम करत आहे. माझ्या मतदार संघांला वेगळा न्याय नाही तुमच्या मतदार संघाला जसा निधी देणार तसाच निधी माझ्या मतदार संघाला हवा. राज्यात ज्याप्रमाणे सर्व मतदार संघांना मिळेल त्याप्रमाणात मी घेऊ शकतो. मात्र मी कधीच कमी निधी घेणार नाही.

error: Content is protected !!