
मालवण शहरासह जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध : सौ. वराडकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख व प्रभावी करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र जिल्हा शल्यचिकित्सक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. श्रीपाद पाटील यांनी जारी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मान्यतेने आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने या समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीमध्ये विविध विभागांच्या लोकप्रतिनिधींसह नगराध्यक्षा ममता वराडकर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्या जिल्ह्यातील आरोग्यविषयक धोरणे आखणे, जनजागृती करणे आणि विविध आरोग्यदायी उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत सक्रिय सहभाग नोंदवतील. या नियुक्तीमुळे मालवण शहर व परिसरातील प्रलंबित आरोग्यविषयक प्रश्नांना थेट जिल्हास्तरावर मांडण्याची आणि ते सोडवण्याची मोठी संधी उपलब्ध झाल्याची भावना मालवणच्या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्षा ममता वराडकर म्हणाल्या, जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाचे आभार मानते. माझ्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडेन. मालवण शहरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.या नियुक्तीसाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मी आभार मानते. सर्वांच्या सहकार्याने नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.
समितीच्या आगामी बैठकीची तारीख, वेळ व स्थळ लवकरच कळवण्यात येणार असून, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी सर्व सदस्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.





Subscribe to my channel






