सरकार नंतर, जिल्हा बँक आधी… शेतकऱ्यांसाठी धावून जाणाऱ्या सिंधुदुर्ग बँकेचा निलेश राणेंकडून कौतुक

सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवींना; नेरूर शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर

नेरूर : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या काही वर्षांत केलेली उल्लेखनीय प्रगती ही जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे, मागील कर्जमाफीच्या काळात सरकारने कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वीच जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली. “महाराष्ट्रात हे पहिले उदाहरण आहे की, बँक आधी शेतकऱ्यांच्या मदतीला धावली आणि त्यानंतर सरकारने मदत जाहीर केली,” असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेरूर शाखा कार्यालयाचे नेरूर देऊळवाडा येथील बापू सडवेलकर यांच्या नूतन इमारतीत स्थलांतर करण्यात आले. या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी उत्साहात झाले. यावेळी बोलताना त्यांनी जिल्हा बँकेच्या प्रगतीचे आणि अध्यक्ष मनीष दळवी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

“राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बँकेला कुठेही डाग लागू न देता गेल्या पाच वर्षांत ज्या प्रगतीच्या मार्गावर नेण्यात आले, त्याबद्दल मनीष दळवी यांचे कौतुक करतो. राणे साहेबांना अपेक्षित असलेल्या बँकेपेक्षाही चांगली बँक सांभाळण्याचे काम त्यांच्या हातून घडत आहे. प्रामाणिकपणे बँक सांभाळत त्यांनी लावलेल्या शिस्तीचे रूपांतर आज बँकेच्या नफ्यात दिसून येत आहे,” असे निलेश राणे यांनी सांगितले.

जिल्हा बँकेने ग्राहक व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असून, बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय अध्यक्ष मनीष दळवी यांना जाते, असेही त्यांनी नमूद केले. संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांनी ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले की, “सामान्य शेतकरी आणि ग्राहकांपर्यंत बँक पोहोचली पाहिजे. बँकेत आल्यानंतर प्रत्येक ग्राहकाला समाधान मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही काम करत आहोत. ग्राहकांनी आमच्यावर विश्वास ठेवला असून, त्यांच्या विश्वासाला साजेश्या सुविधा देणे ही आमची बांधिलकी आहे.”गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा बँकेने सुमारे ८ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असल्याचे दळवी यांनी सांगितले. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्यांच्या मतदारसंघातील ज्या-ज्या शाखांचे उद्घाटन झाले, त्या शाखांनीही चांगली प्रगती केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोरे, विद्याप्रसाद बांदेकर, सौ. नीता राणे, संदीप परब, व्हिक्टर डान्टस, रवींद्र मडगावकर, केशव नारकर, कुडाळ खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष, नेरूरच्या सरपंच सौ. भक्ती घाडीगावकर, कवठीच्या सरपंच सौ. स्वाती करलकर, वालावलचे सरपंच राजेश प्रभू, महादेव विकास संस्थेचे अध्यक्ष मंगेश बांदेकर, चिंदवण विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील नाईक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, नेरूर शाखा व्यवस्थापक सौ. युगा पेडणेकर, बँक अधिकारी श्याम सरमळकर, निलेश कनयाळकर यांच्यासह बँकेचे ग्राहक, पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नूतन शाखेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल बँकेच्या वतीने जागामालक बापू सडवेलकर यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!