
नगरसेविका नीना मुंबरकर आणि स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम; वाहतुकीचा अडथळाही दूर
मालवण : शहरातील देऊळवाडा–आडारी मार्गालगत वाढलेल्या दाट झाडीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्याचबरोबर झाडांच्या फांद्या व वेली वीज वाहिन्यांना घासत असल्याने आडारी परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या निर्माण झाली होती. यामुळे स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे वीज वाहिन्यांवरील झाडी हटविण्याची मागणी केली होती.
मात्र, या मागणीवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी नगरसेविका नीना मुंबरकर यांच्याकडे ही समस्या मांडली. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन मुंबरकर यांनी पुढाकार घेत सोमवारी सकाळी देऊळवाडा–आडारी मार्गावरील झाडी हटविण्याची मोहीम हाती घेतली.
नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह जेसीबीच्या सहाय्याने तसेच स्थानिक नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागातून रस्त्यालगतची वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडी हटविण्यात आली. झाडी आणि वेली हटवल्याने वीज वाहिन्यांभोवती निर्माण झालेला वेढा दूर झाला असून, रस्ताही अधिक मोकळा झाला आहे.
या मोहिमेत नगरपरिषद स्वच्छता मुकादम वळंजू यांच्यासह सफाई कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोहन फाटक, मुन्ना फाटक, बाळू फाटक, समीर फाटक, निलेश शिरोडकर, संदीप गावकर, मिलिंद फाटक, विद्याधर फाटक, संजय गावकर, अक्षय नाटेकर, हरी भोजणे, आदित्य चव्हाण आदी सहभागी झाले. वीज वाहिन्यांवरील झाडीचा प्रश्न आणि वाहतुकीचा अडथळा एकाचवेळी दूर झाल्याने आडारी परिसरातील नागरिकांनी नगरसेविका नीना मुंबरकर आणि सहभागी स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराचे समाधान व्यक्त केले.






Subscribe to my channel






