
जगदीश मरीन एक्सपोर्ट्स आणि मौर्य ॲक्वेक्सला भेट; आंतरराष्ट्रीय गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि निर्यात व्यवस्थापनाचा घेतला आढावा
आंध्र प्रदेश : महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय आणि समुद्री खाद्यपदार्थांच्या निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशातील आधुनिक कोळंबी प्रक्रिया उद्योगांची पाहणी केली. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील रायालम-भीमावरम येथील जगदीश मरीन एक्सपोर्ट्स आणि मौर्य ॲक्वेक्स या उद्योगांना भेट देत त्यांनी प्रक्रिया तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय निर्यात व्यवस्थापनाची माहिती घेतली.
या भेटीदरम्यान कोळंबीची प्रतवारी, सोलणे, स्वच्छता, प्रक्रिया आणि निर्यातक्षम उत्पादनांची निर्मिती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच कोळंबी गोठवण्यासाठी वापरले जाणारे आयक्यूएफ (IQF) व ब्लॉक फ्रीझिंग तंत्रज्ञान, शीतसाखळी व्यवस्थापन, अन्नसुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी यांचा अभ्यास करण्यात आला.
समुद्री खाद्यपदार्थांचे मूल्यवर्धन, उत्पादनांचे विविधीकरण आणि निर्यातीसाठी आवश्यक आधुनिक सुविधा उभारण्याच्या दृष्टीने आंध्र प्रदेशातील या उद्योगांचे मॉडेल महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात.
प्रक्रिया उद्योगांचा विस्तार झाल्यास मच्छीमारांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळण्यासोबतच स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते. आंध्र प्रदेशातील आधुनिक मत्स्य प्रक्रिया उद्योगांच्या अनुभवाचा उपयोग करून महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम करणे आणि समुद्री खाद्यपदार्थांच्या निर्यातीची क्षमता वाढवणे, हा या अभ्यास दौऱ्याचा महत्त्वाचा उद्देश आहे.







Subscribe to my channel






