ढोलताशांच्या गजरात ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यात पारंपरिक शिवजयंती साजरी 

शिवरायांनी उभारलेले किल्ले हे केवळ पर्यटन क्षेत्र नाहीत तर ती तीर्थक्षेत्रे : व्याख्याते सुधीर थोरात यांचे प्रतिपादन

मालवण : येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात रविवारी पारंपारिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी जय भवानी… जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा देत… ढोल ताशांचा गजर करीत… मर्दानी खेळ सादर करीत आणि घोषवादनातून शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची राजधानी असलेला तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता प्राप्त सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिरात इ.स. १६९५ पासून छत्रपती राजाराम महाराज यांनी शिवजन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली होती. ही परंपरा आजतागायत अखंडपणे ३३१ वर्षे जोपासली जात आहे. या परंपरेनुसार मालवणातील शिवप्रेमीनी एकत्र येत शिवजयंती साजरी केली.

प्रारंभी स्वराज्य ढोलपथकाद्वारे ढोलताशा वादन करण्यात आले. त्यानंतर मर्दानी खेळ सादर झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपिठावर प्रमुख वक्ते शिवशंभू विचारमंचचे महाराष्ट्र संयोजक सुधीर थोरात, कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिवराजेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ, वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान लुडबे, मंदिराचे सेवेकरी श्रीराम सकपाळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघचालक अरविंद कुडतरकर, जिल्हा कार्यवाह विनय धावले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. पवन बांदेकर यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी व्याख्याते सुधीर थोरात यांचे शिवचरित्र व सिंधुदुर्ग किल्ला यावर व्याख्यान संपन्न झाले. परकीय शक्तींकडून भारतातील हिंदू समाजावर भीषण अत्याचार होत असताना आणि प्रतिकूल परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्मिती केली. त्याकाळी परकीय आव्हाने निर्माण झाली होती व आजही आपल्या देशात अनेक आव्हाने निर्माण झाली असून ती ओळखून मोडीत काढणे गरजेचे आहे. यासाठी इतिहास अभ्यासला पाहिजे, शिवरायांचे विचार आत्मसात करून एकत्वाची भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. शिवरायांनी उभारलेले किल्ले हे केवळ पर्यटन क्षेत्र नाहीत तर ते तीर्थक्षेत्र आहेत, असे यावेळी सुधीर थोरात यांनी सांगितले.

यावेळी सयाजी सकपाळ व श्रीराम सकपाळ यांनी शिवराजेश्वर मंदिरातील विविध कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील आठ तालुक्यातून आलेले आठ प्रतिनिधी, नगरसेवक रविकिरण तोरसकर, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, ललित चव्हाण यांच्यासह रिल्स स्पर्धा पारितोषिक पुरस्कर्ते व उत्सवासाठी सहकार्य करणाऱ्यांचे सन्मान करण्यात आले. सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले. त्यानंतर शिवजन्माच्या मुहूर्तावर शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवक संघ सिंधुदुर्गतर्फे घोषवादन करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवआरती होऊन सांगता झाली. त्यानंतर उपस्थित शिवप्रेमीनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

रिल्स स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

पारंपारिक शिवजयंती निमित्त आयोजित रिल्स स्पर्धेतील विजेत्यांना या उत्सवात रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत प्रथम – संकेत हसोळकर, द्वितीय – स्वानंद सामंत, तृतीय – हनु हडकर (मालवणी माणूस) उत्तेजनार्थ – निलेश सावंत (सावतांचां सर्किट) व साळगावची आडसारा यांनी यश मिळविले. तर कोकणचा सिद्धार, सोहम गावकर (सोलो मास्टर) व सोहम एडिट्झ यांना सहभाग पारितोषिक देण्यात आले. 

या उत्सवास भूषण साटम, भाऊ सामंत, शिल्पा खोत, रत्नाकर कोळंबकर, राजू सावंत, भूषण मेतर, ज्योती तोरसकर, शिल्पा गाड, अमृता फाटक, प्रविणा शिंदे, अमिता न्हिवेकर, श्रीराज बादेकर, सुशांत तायशेटे, प्रवीण पवार, ऍड. हेमेंद्र गोवेकर, दिलीप वायंगणकर, चेतन आजगावकर, योगेश वारंग, अमित नाईक, अमित भगत, मोरेश्वर गोसावी, राजेश वळंजु, राजन कामत, हितेश वायंगणकर, गणेश कोळगे, साईप्रसाद वालवलकर गणेश केळुसकर, कमलेश चव्हाण, सुनील धुरी, रुपेश सुर्वे, सचिन सुतार, महेश कानिटकर, सौरभ नागोळकर, शैलेश वारंग, मंदार बागलकर, विष्णू निगुडकर, अरुण गव्हाणकर, शैलेश खाडिलकर, गुरुप्रसाद कामत यांसह शिवराजेश्वर मंदिर देवस्थानचे पदाधिकारी, किल्ला रहिवासी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सदस्य, शिवप्रेमी, मालवण व वायरी भूतनाथचे नागरिक आणि विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या उत्सवासाठी किल्ला प्रवासी वाहतूक संघटना, शिवराजेश्वर होडी संघटना, शिवशक्ती होडी संघटना व दांडेश्वर दांडी होडी संघटना यांनी मोफत होडी वाहतूकीसाठी सहकार्य केले.

error: Content is protected !!