
पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, राष्ट्रीयकृत व ग्रामिण बँकांची आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिध्द झाली आहे. जिल्ह्यातील ४२० गावांमधील विकास संस्था व जिल्हा बँकेकडील २७५७, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकेकडील ९१७ अशा एकुण ३ हजार ६७४ शेतकऱ्यांची यादी गावनिहाय प्रसिध्द झालेली आहे. सदर पात्र शेतकऱ्यांची यादी ही संबंधीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय व तालुका सहाय्यक निबंधक सहकारी अधिकारी श्रेणी ०१ सहकारी संस्था कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी क्रमांक अनिवार्य असून ज्या शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टॅक नोंदणी नसेल त्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार केंद्र/सीएससी केंद्रावर जाऊन अॅग्रीस्टॅक नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रदिप मालगावे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
या योजनेतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळणेसाठी यादीमधील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र/महा ई सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घेणे गरजेचे आहे. आधार प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड, अॅग्रीस्टॅक फामर आयडी व कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबुक सोबत घेवुन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी. आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रकिया ही जिल्ह्यामधील आपले सरकार केंद्र, महा ई सेवा केंद्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थामध्ये करण्यात आली आहे. आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया ही विनामुल्य असून कोणत्याही केंद्रावर पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरणासाठी कोणतीही रक्कम आदा करु नये. तरी सर्व पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रदीप मालगावे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.





Subscribe to my channel






