कर्ली नदीपात्रात होडी उलटली; एक जण बेपत्ता

आंबेरी-वाकवाडी येथे शेतीच्या कामासाठी जाताना दुर्घटना; दोघांना वाचवण्यात यश, स्कुबा डायव्हिंग पथकाकडून शोधमोहीम

मालवण : गणेशोत्सवानिमित्त आंबेरी-वाकवाडी येथील सासरवाडीला आलेले मुंबईतील दर्शन चंद्रकांत टकारिया (मूळ रा. गुजरात) हे कर्ली नदीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झाले आहेत. गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, टकारिया यांचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांसह प्रशासन आणि स्कुबा डायव्हिंग पथकाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टकारिया कुटुंबातील सदस्यांसोबत नदीपलीकडील जुवा येथे शेतीच्या कामासाठी छोट्या होडीने प्रवास करत होते. यावेळी अचानक होडीचे संतुलन बिघडले आणि होडी नदीपात्रात उलटली. त्यामुळे होडीतील चौघेजण पाण्यात पडले. या प्रसंगी होडीचालक स्वप्नील संदीप वाक्कर यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांनी श्वेता टकारिया आणि प्रणल वाक्कर यांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र दर्शन टकारिया हे नदीच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याने बेपत्ता झाले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासनालाही माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत, पोलीस, महसूल यंत्रणा, पोलीस पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, बेपत्ता दर्शन टकारिया यांचा शोध घेण्यासाठी स्कुबा डायव्हिंग पथकाची मदत घेण्यात आली असून कर्ली नदीपात्रात व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे. नदीचा प्रवाह आणि परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन बचाव पथकांकडून विविध ठिकाणी शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमुळे टकारिया कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले असून, दर्शन टकारिया यांचा लवकरात लवकर शोध लागावा यासाठी प्रशासन आणि बचाव पथकांचे प्रयत्न सुरू आहेत.

error: Content is protected !!