भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव दिमाखात संपन्न!

ऑरेंज हाऊसने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद; लाठी-काठी, मल्लखांब आणि विद्यार्थ्यांच्या कवायती ठरल्या प्रमुख आकर्षण

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव ‘डिफरंट बिट्स, वन स्पोर्टिंग स्पिरिट’ या संकल्पनेखाली उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात संपन्न झाला. विविध क्रीडा स्पर्धा, शिस्तबद्ध संचलन, आकर्षक कवायती आणि पारंपरिक खेळांच्या प्रात्यक्षिकांनी या महोत्सवात विशेष रंगत आणली. सर्वसाधारण हाऊस चॅम्पियनशिपमध्ये ऑरेंज हाऊसने विजेतेपद पटकावले, तर यलो हाऊस उपविजेता ठरले.

संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव संजीव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सैनिक स्कूलचे प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई आणि उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक उपस्थित होते.

स्वागतगीत आणि मशाल संचलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध संचलन आणि कवायतींनी उपस्थितांची दाद मिळवली. पूर्वप्राथमिक ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजक खेळ आणि मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्याचे दर्शन घडविणारी लाठी-काठी आणि मल्लखांबाची प्रात्यक्षिके महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरली.

स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. मार्च पास्ट, हाऊस ड्रिल यांसह उत्कृष्ट खेळाडूंसाठी ‘बेस्ट अ‍ॅथलेटिक बॉय’ आणि ‘बेस्ट अ‍ॅथलेटिक गर्ल’ हे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. सहावी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या संघांमध्ये झालेली रस्सीखेच स्पर्धा चांगलीच रंगतदार ठरली.

ऑरेंज हाऊसची विजेतेपदावर मोहोर

सर्वसाधारण हाऊस चॅम्पियनशिपमध्ये ऑरेंज हाऊस (अग्नी हाऊस) यांनी सर्वाधिक यश मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर यलो हाऊस (वायू हाऊस) यांनी उपविजेतेपद पटकावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रेसीडा डिसोझा, ज्योती लोखंडे आणि प्रशांती चव्हाण यांनी केले. प्राची कुडतरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव देण्यासोबतच शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित करणारा हा क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. विविध क्रीडा प्रकारांतील सहभाग आणि सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते

error: Content is protected !!