आ. निलेश राणेंचा निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप ; माजी आ. वैभव नाईकांचा आरोप, चौकशीची मागणी

सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेले पत्र आणले समोर; मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार

सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण मतदारसंघातील विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. या आरोपांच्या समर्थनार्थ निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत, मागील दोन वर्षांतील निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी नाईक यांनी केली आहे.

वैभव नाईक यांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या विकासकामांच्या निविदांमध्ये हस्तक्षेप केला जात आहे. स्पर्धात्मक पद्धतीने कमी दराने निविदा भरणाऱ्या काही ठेकेदारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून त्यांच्या निविदा रद्द केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर संबंधित कामांसाठी फेरनिविदा काढण्यात आल्याने शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याचेही नाईक यांनी म्हटले आहे.

काही ठेकेदारांना निविदा मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप करत, निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि समान संधी राखली जात नसल्याचा दावा त्यांनी केला. या प्रक्रियेमागे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोपही नाईक यांनी केला आहे. आमदार निलेश राणे यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेले पत्र सध्या चर्चेत असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही ठेकेदारांनी यापूर्वी घेतलेली कामे अपूर्ण ठेवली असतानाही त्यांना नवीन कामे मिळत असल्याचा आरोप नाईक यांनी केला.

निविदा प्रक्रियेतील कथित अनियमितता, कामांचे वाटप आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.शासनाने विकासकामांच्या निविदा स्पर्धात्मक पद्धतीने व्हाव्यात, यासाठी नियमावली तयार केली आहे. कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांकडून नियमानुसार आवश्यक अनामत रक्कम घेणे आणि अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करून घेणे ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, असे नाईक यांनी सांगितले.

निविदा प्रक्रियेत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी हस्तक्षेप केल्यास स्पर्धात्मक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. मागील दोन वर्षांत कुडाळ-मालवण परिसरातील विकासकामांच्या निविदा प्रक्रियेची तपासणी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे केली आहे.

error: Content is protected !!