सिंधुदुर्ग-चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश; रविवारसह दररोज विमानसेवा सुरू होणार

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध होणार आहे. रविवारसह दररोज विमानप्रवासाची सुविधा मिळणार असल्याने सिंधुदुर्गवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, या विमानसेवेचे दररोजचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

जाहीर वेळापत्रकानुसार, नवी मुंबई येथून सकाळी ७:५५ वाजता विमान उड्डाण करेल आणि सकाळी ९:०५ वाजता सिंधुदुर्गात पोहोचेल. त्यानंतर सिंधुदुर्ग येथून सकाळी ९:२५ वाजता विमान उड्डाण करून सकाळी १०:३५ वाजता नवी मुंबई येथे दाखल होईल.

या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार असून, प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. विशेषतः पर्यटन, व्यापार, उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. आठवड्याचे सातही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार असल्याने सिंधुदुर्गच्या हवाई कनेक्टिव्हिटीला नवी झेप मिळणार आहे.

error: Content is protected !!