
वासराच्या मृत्यूनंतर गायीचाही मृत्यू ; मनसेचा खळबळजनक आरोप, मुख्याधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
मालवण : मालवण नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या गोवंशाच्या देखभालीबाबत गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. नगरपालिकेच्या ताब्यातील एका गायीने वासराला जन्म दिल्यानंतर योग्य अन्न-पाणी व आवश्यक काळजीच्या अभावामुळे वासराचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संबंधित गायीचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याचा दावा मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत संपूर्ण घटनेची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. श्री. अन्ननसिएशन यांच्या म्हणण्यानुसार, नगरपालिकेच्या ताब्यातील गोवंशाच्या देखभालीबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. गोवंशाला वेळेवर पुरेसे अन्न-पाणी मिळत नसून त्यांना अस्वच्छ परिस्थितीत ठेवले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मृत गायीची विल्हेवाट लावण्यासही विलंब
या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे मृत गायीचा मृतदेह संध्याकाळपर्यंत त्याच गोठ्यात पडून असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. मृत जनावराची वेळेत विल्हेवाट न लावणे ही देखील गंभीर प्रशासकीय बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नगरपालिकेला ताब्यातील गोवंशाची योग्य देखभाल करणे शक्य नसेल, तर त्यांना मान्यताप्राप्त गोशाळेत किंवा त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करावे, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘गोमाता’ म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष काळजी महत्त्वाची
गोवंशाबाबत श्रद्धा व्यक्त केली जाते, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असेल तर ही गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे. गोवंशाच्या कल्याणासाठी केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष सुविधा आणि जबाबदार देखभाल आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
नगरपालिकेच्या ताब्यातील सर्व गोवंशाला नियमित अन्न, स्वच्छ पाणी, स्वच्छ निवारा आणि आवश्यक पशुवैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत. तसेच वासराच्या व गायीच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यामागील कारणे स्पष्ट करावीत आणि निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. नगरपालिकेला गोवंशाची योग्य देखभाल करणे शक्य नसल्यास त्यांना तातडीने मान्यताप्राप्त गोशाळेत किंवा त्यांच्या मालकांकडे सुपूर्द करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी गॅरी अन्ननसिएशन यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.






Subscribe to my channel






