समय बडा बलवान है… नितेश राणेंकडून पुन्हा ते ट्विट !
गुरुवारी दिवसभर रंगलेल्या चर्चांना ट्विट मधून प्रत्युत्तर ?
कुणाल मांजरेकर
मालवण : पोलीस कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम यांचा फोटो असलेलं ट्वीट केलं होतं. मात्र मागाहून आज हे ट्विट त्यांनी डिलीट केल्यानं हे ट्विट त्यांना महागात पडल्याच्या बातम्या झळकू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा हेच ट्विट करत या सर्व चर्चांना प्रत्युत्तर दिल्याचं बोललं जात आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात कोठडीत असणारे आमदार नितेश राणे गुरुवारी त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आले. बुधवारी कोर्टात शरण येण्यापूर्वी महाविकास आघाडीला इशारा देत त्यांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी सध्याचे गृहमंत्री अमित शाह आणि माजी गृहमंत्री चिदंमबरम यांचा फोटो टाकला होता. त्या फोटाला नितेश राणे यांनी “समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है” अशा आशयाचे सूचक ट्विट केलं होतं. काल दिवसभर याच ट्विटची चर्चा होती. पण हेच ट्विट नितेश राणे यांनी गुरुवारी डिलीट केल्यानं त्यांना हे ट्विट महागात पडल्याच्या चर्चा गुरुवारी दिवसभर सुरू होत्या.
२००९ ला पी. चिदंमबरम गृहमंत्री असताना अमित शाह यांना अटक झाली होती, तर अमित शाह गृहमंत्री असताना चिदंमबरम यांना अटक झाली होती. त्यामुळे नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला आमचीही वेळ येईल तेव्हा तुम्हालाही अशीच वागणूक मिळेल, असा इशाराच जणू दिला होता. मात्र सिंधुदुर्गातला वाद दिल्लीपर्यंतच्या नेत्यांपर्यंत नेणं नितेश राणे यांना महागात पडलं आणि त्यांना शेवटी ते ट्विट डिलीट करावं लागलं, अशी चर्चा सुरू झाली. परंतु, आ. नितेश राणे यांनी गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा हे ट्विट करून आपल्या टीकाकारांना उत्तर दिलंय का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.