विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मालवणच्यावतीने आयोजन : आंगणेवाडी यात्रेत बक्षीस वितरण


मालवण : हिंदू धर्मावरील संकटांचा सामना करण्यासाठी आणि तरुण पिढीमध्ये धर्माबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मालवण प्रखंडाच्या वतीने ‘जिल्हास्तरीय रील स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेच्या दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे धर्म प्रसारक मालवण प्रमुख अवि सामंत यांनी शनिवारी मालवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
हॉटेल अदिश येथे आयोजित या पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषद प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत, बजरंग दल मालवण प्रखंड संयोजक गणेश चव्हाण, जिल्हा बजरंग दल संयोजक कृष्णा धुळप्पनवार, जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, अमोल गावडे, अनिकेत फाटक, तेजस चव्हाण, प्रसाद हळदणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले की, आजही ग्रामीण भागात गरीब आणि गरजू हिंदू कुटुंबांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार घडत आहेत. ही बाब रोखण्यासाठी आणि हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी प्रभावी जनजागृतीची गरज आहे. सध्याची तरुण पिढी सोशल मीडिया आणि रिल्समध्ये सक्रिय असल्याने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून धर्माचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्मरक्षण आणि हिंदू संस्कृती या विषयावर आधारित ही रील स्पर्धा असून यामध्ये विजेत्यांना अनुक्रमे १११११/-, ७७७७/-, ५५५५/- रुपये तसेच उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, बालकलाकार आणि उत्कृष्ट दिग्दर्शक अशी विशेष पारितोषिकेही दिली जाणार आहेत. धार्मिक श्रद्धेचे केंद्र असलेल्या आंगणेवाडी यात्रेत विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विशेष कार्यालय थाटले जाणार आहे. यात्रा संपेपर्यंत कार्यकर्ते तेथे उपस्थित राहून भाविकांना हिंदू धर्माच्या कार्याची माहिती देतील. महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत हिंदुत्वाची ताकद वाढवणे आवश्यक आहे असे मत प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत यांनी व्यक्त केले.
या मोहिमेला बळ देण्यासाठी कोकण विश्व हिंदू परिषदेचे अनिरुद्ध भावे, बजरंग दलाचे श्री. ठाकूर यांच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त हिंदूंनी या धर्मकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Subscribe to my channel




