
मालवण तालुक्यातील घटना, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे गाडीतच ; सुदैवानेच किरकोळ दुखापतीवर निभावलं
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यात अनधिकृत वाळू उत्खनन विरोधी मोहिमेवर असलेल्या कुडाळ मालवणच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्या शासकीय गाडीला अपघात झाल्याची दुर्घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मालवण तालुक्यातील गोळवण नजिक कुमामे भागात गवस घरानजीकच्या उतारावर घडली. चालकाचा गाडी वरील ताबा सुटल्याने गाडी दहा फूट खोल रस्त्यालगतच्या भागात कोसळली. यावेळी प्रांताधिकारी यांच्यासह प्रांत कार्यालयातील काही कर्मचारी देखील गाडीत होते. सुदैवानेच किरकोळ दुखापतीवर हे प्रकरण निभावले. या अपघाताची मोठी चर्चा महसूल कर्मचाऱ्यांमध्ये होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळपासून प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत वाळू काढण्यावर कारवाई करण्यासाठी पथक मसुरे बांदिवडे परिसरात गस्त घालत होते. ही कारवाई आटोपल्या नंतर बुधवारी रात्री उशिरा कुडाळ येथे जाण्यासाठी त्या निघाल्या असता त्यांची गाडी क्रमांक (MH 07 G 2197) ही गोळवण सोडून कुमामे भागात गवस घरानजीक उतारावर चालक लाडू सीताराम शेडगे यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दहा फूट खोल रस्त्यालगतच्या भागात कोसळली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी अपघाताचा आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली व प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांना खासगी वाहनातून कुडाळ येथे पाठवले. अपघातावेळी गाडीत प्रांताअधिकारी, चालक, तसेच प्रांत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. मात्र, सुदैवाने त्यापैकी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
अपघाताची खबर मिळताच कट्टा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला, हेड कॉन्स्टेबल प्रकाश मोरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी प्रांत कार्यालयातील अधिकारी शिंदे, मंडळ अधिकारी संतोष गुरखे, मंडळ अधिकारी डी. वी. शिंगरे, अजय परब, पीटर लोबो, दीपक शिंदे, श्री अलकुटे, गौरी कोकरे, गुरव, मालवण तलाठी गौरव दळवी, अनिकेत कासले, श्रीधर नाईक, संतोष नाईक, स्वप्निल साळकर, योगेश वेंगुर्लेकर, सचिन चव्हाण, बाबू चव्हाण या महसूल कर्मचाऱ्यासहित गोळवण सरपंच शरद मांजरेकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रियांका मनवर, पोलीस पाटील राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी गोळवण कुमामे ग्रामस्थांतर्फे दादा मिठबावकर, विनित भोजने, राजेंद्र थवी व ग्रामस्थांनी अपघात प्रसंगी सहकार्य केले. दरम्यान दुपारी प्रांताधिकाऱ्याची गाडी अपघातस्थळावरून काढून दुरुस्तीसाठी पाठविली. मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कट्टा पोलीस कर्मचारी सदर घटनेचा अधिक तपास करीत आहेत.



Subscribe to my channel




