आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक नियोजन करा

पावसाळ्यापूर्वीची सर्व प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत : पालकमंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत सूचना

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व पत्तन विभाग यांच्या विविध विकासकामांबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध प्रलंबित कामांचा आढावा घेऊन त्यांची सद्यस्थिती, अंमलबजावणी आणि पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुढील पंधरा दिवसांत पावसाळा सुरू होण्याची शक्यता लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वीची सर्व प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधितांना दिले. डोंगराळ भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती व देखभालीदरम्यान पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करून त्याबाबतची माहिती आरटीओ तसेच नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवावी, याशिवाय सर्व कामांमध्ये दर्जेदार गुणवत्ता राखून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, दिनेश बागुल अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पूजा इंगावले कार्यकारी अभियंता व इतर संबंधित अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

error: Content is protected !!