
वाळू विक्रीतील अर्धे पैसे ‘साहेबांना’, ट्रॅक्टर चालकाकडून धक्कादायक उत्तर ; बाबी जोगीनी उघड केला प्रकार
मालवण | कुणाल मांजरेकर
अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून मालवणमध्ये समुद्र किनारपट्टी वरील वाळूची खुलेआम चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी उघड केला आहे. तहसीलदार कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिवला बीच वर ट्रॅक्टर मधून वाळू उपसा सुरु असून या ट्रॅक्टर चालकाला विचारणा केली असता वाळू विक्रीतून मिळणाऱ्या पैशातील अर्धी रक्कम साहेबांना दिली जात असल्याचे उत्तर त्याच्याकडून मिळाल्याचे बाबी जोगी यांनी म्हटले आहे.
याबाबत श्री. जोगी यांनी म्हटले आहे की, मालवण शहरातील स्वच्छ सुंदर तसेच पर्यटकांचं पसंतीचे बीच अशी ओळख असलेल्या चिवला बीचला आता वाळू माफियांची नजर लागली आहे. मालवण तहसीलदार ऑफिस तसेच पोलीस स्टेशनला लागून असलेल्या या बीच वरती बिनधास्तपणे दररोज सकाळी व शनिवार रविवार संपूर्ण दिवसभर हे वाळू माफिया बिनधास्त वाळूची तस्करी करत आहेत. त्या ट्रॅक्टरला कुठचीही नंबर प्लेट लावलेली नसते. त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला विचारणा केली असता त्यांच्याकडनं असं उत्तर आलं की या वाळूतील विक्री केलेले अर्धे पैसे आम्ही साहेबांना देतो व वाळूचा एक ट्रॅक्टर पाच ते सहा हजारांना विकतो. म्हणूनच एवढ्या प्रमाणात दररोज वाळू चोरी होत असताना महसूलचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत का? असा सवाल उपस्थित करुन सोमवारी तहसीलदारांची भेट घेऊन ही वाळू चोरी रोखण्याची आम्ही मागणी करणार आहोत. तसेच वाळू चोरीतील अर्धे पैसे साहेब घेतात असा ड्रायव्हर बोलला. त्या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी आम्ही मालवण तहसीलदार यांच्याकडे करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.





Subscribe to my channel






