यंदाच्या नुकसानीची कारणे अभ्यासून पुढील वर्षी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याबाबत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून माहिती मागवली
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
यंदाच्या हंगामात वातावरणातील बदलामुळे आंबा व काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे येथील आंबा बागायतदार व शेतकरी आर्थिक संकटात आला असून माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी याची दखल घेतली आहे. यंदाच्या हंगामात आंबा व काजू पिकाच्या झालेल्या नुकसानीची कारणे अभ्यासून पुढील वर्षीच्या हंगामात अशी नुकसानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती देण्याची सूचना खा. राणे यांनी कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात खा. नारायण राणे यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याचा व काजूचा मोहोर हवामानातील अनियमित बदल व तापमानातील तीव्र चढ-उतार तसेच विविध कीड रोगांच्या प्रादुर्भावाने अपेक्षित उत्पादन नष्ट झाले आहे. अनेक शेतकरी व आंबा बागायतदार यांनी प्रत्यक्ष भेटून ही खंत व्यक्त केली आहे. तरी आंचा व काजू मोहोर झाडावर जळून जाण्याची कारणे काय आहेत ? तसेच पुढील वर्षी आंबा व काजू मोहोर झाडावर जळून जाऊ नये म्हणून आपल्या विभागातून काय उपाययोजना करण्यात आली आहे, याबाबतची माहिती आपण मला द्यावी असे त्यांनी म्हटले आहे.