देवबागच्या बंधाऱ्याचे काम तात्काळ सुरू होणार ; ना. राणेंच्या खासदार निधीतून एक कोटी उपलब्ध
माजी खा. निलेश राणेंची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा ; देवबाग मधील परिस्थितीची दिली माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग किनारपट्टीची मोठी धूप होत आहे. याठिकाणी बंधारा उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार निधीतून एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन या कामाला तात्काळ मान्यता देण्याची मागणी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन मंगळवारी केली. यावेळी तात्काळ वर्क ऑर्डरला मान्यता देण्याची ग्वाही श्रीमती मंजुलक्ष्मी यांनी दिली.
मालवण तालुक्यातील देवबाग किनारपट्टीची धूप होत असून मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवबागला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी पावसाळ्यात या गावाला सागरी अतिक्रमणापासून होणारा धोका लक्षात घेऊन ना. राणे यांनी खासदार निधीतून १ कोटी रुपये तात्काळ देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी मागील आठवड्यात येथे पाहणी करून बंधाऱ्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली होती. आता पावसाळा तोंडावर आला असल्याने तात्काळ येथे बंधाऱ्याची गरज असून या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दाजी सावजी यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी बंधाऱ्याची गरज जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असता वर्क ऑर्डरला तात्काळ मंजुरी देऊन तातडीने काम सुरू करण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत निलेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले.