महाराष्ट्रात “पोलीसजीवी” सरकार : मात्र संपूर्ण भाजपा राणेसाहेबांच्या पाठीशी !

राणेसाहेबाना अटक केली तरी जनआशीर्वाद यात्रा थांबणार नाही ; देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट 

मुंबई : महाराष्ट्रात पोलीसजीवी सरकार आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी पोलीस बळाचा वापर करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र नारायण राणे यांना पोलिसांना अटक केली तरी भाजपची जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नारायण राणे यांच्या अनुपस्थितीत प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार या जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्त्व करतील आणि ती पूर्ण करतील, असे त्यांनी म्हटले आहे. 

नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेने राज्यभरात छेडलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आम्ही भाजप नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वक्तव्याचे समर्थन करत नाही, पण भाजप एक पक्ष म्हणून नारायण राणे यांच्या पाठिशी आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या वाक्यानं मोठा वाद निर्माण झालाय. मुळात राणे साहेब हे बोलण्याच्या ओघात हे झालं असावं. पण मुख्यमंत्री स्वातंत्रदिन विसरतात तेव्हा कोणाच्याही मनात राग निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे. भारतीय जनता पक्ष राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नसेल पण पक्ष संपूर्णपणे, पूर्ण ताकदीनं राणेंसोबत आहे. ज्या पद्धतीनं कारवाई होतेय ही चुकीची आहे. एखाद्याच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो, पण तो वेगळ्या पद्धतीने निषेध म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. हे सांगत असताना यामध्ये सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे, त्याचं बिलकुल समर्थन करु शकत नाही. एखाद्याने वासरु मारलं म्हणून आम्ही गाय मारु, असं सरकार वागत असेल तर एक गोष्ट सांगतो, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नसेल, पण भाजप पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठिशी उभा राहील आणि राहतोय.

शर्जिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो, हिंदुंना खुनी म्हणतो, त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता, आणि आज मात्र आख्खं पोलीस फोर्स नारायण राणेंवर कारवाईसाठी एक पोलीस पथक नाशिकहून, एक पुण्याहून निघालं आहे. कायद्याप्रमाणे हा कॉग्निजेबल ऑफेसन्स नाही, तुम्हाला आधी त्यांची बाजू ऐकावी लागेल, त्यानंतर कारवाई करावी लागेल,.मात्र ज्याप्रमाणे पोलिसांचा गैरवापर सुरु आहे, तो अतिशय चुकीचा आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे, पाच वर्ष मी त्यांच्या सोबत काम केलं आहे. संपूर्ण देशात नि:पक्ष पोलीस म्हणून त्यांची ख्याती आहे. पण आता ज्या पद्धतीने त्यांचा ऱ्हास होत आहे, तो चुकीचा आहे. सरकार बस म्हटल्यावर हे लोटांगण घालत आहेत. केवळ सरकारला खूश करण्यासाठी पोलीस कारवाई करायला लागले तर महाराष्ट्राची प्रतिमा तशी राहणार नाही. आधीच या सरकारच्या काळात जी वसुली कांडं झाली आहेत, त्यामुळे प्रामाणिक पोलिसांबाबत नजर बदलली आहे.अशा परिस्थितीत ज्या पद्धतीने सरकार पोलिसांचा वापर करत आहे, मला वाटतं पोलिसगिरी करत आहेत. प्रत्येकवेळी कोर्टाकडून चपराक बसत आहे. अर्णवपासून कंगनापर्यंत सर्व ठिकाणी चपराक बसल्या. हे जे चालू आहे ते योग्य नाही.मी सल्ला देतो, कायद्याने काम करा, बेकायदेशीरपणे काम करणारे पोलीस सध्या कुठे आहेत ते मी सांगण्याची गरज नाही. एकाच ऑफेन्सला तीन तीन गुन्हे दाखल होतात, ही ताकद शर्जिल उस्मानीबाबत दाखवा,.

शिवसैनिक दगडफेक करत आहेत, ते म्हणतात आम्ही उद्धवजींच्या आदेशाने करत आहोत. भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला तर खबरदार, आम्ही हिंसा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला केला तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही त्या त्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करु. हे कायद्याचं राज्य आहे, तालिबान नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!