आमदार निलेश राणे यांची मनोज जरांगे पाटीलना समज ; तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे, कौटुंबिक राहिले ते तसेच राहण्याची अपेक्षा
मालवण | कुणाल मांजरेकर
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे याच्यावर वैयक्तिक टीका केल्यानंतर नितेश राणे यांचे ज्येष्ठ बंधू आमदार निलेश राणे यांनी या वादात उडी घेतली आहे. कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही. नितेश राणे एखाद्या विषयावर बोलल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा. पण वैयक्तिक टीका नको. नितेश काही टोकाचं बोलला नाही, किंवा वैयक्तिक बोलला नाही. तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणे पण असतो. आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोण हाथ टाकायच्या वार्ता करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही, असा इशारा आ. निलेश राणे यांनी दिला आहे.
भाषा जपून वापरली पाहिजे. आम्ही तुम्ही काही परके नाही. विषय सोडवताना नातं तुटता कामा नाही याची काळजी घेतली पाहिजे. मनोज जरांगे पाटील तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे राहिले, कौटुंबिक राहिले ते तसेच राहिले पाहिजे. मी आज पर्यंत नातं जपलं, पुढे ही जपेन… आपल्याकडून पण तीच अपेक्षा आहे, असे आ. राणे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.