
शेकडो नागरिकांचे सोने अडकले; ‘मुथ्थुट फिनकॉर्प’च्या मॅनेजर स्नेहा जामसंडेकर हिला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
मालवण : विश्वासाने तारण ठेवलेले सोने, आकर्षक परताव्याचे आमिष आणि त्यातून तब्बल ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५१५ रुपयांची फसवणूक! मालवण शहरासह जिल्ह्यात खळबळ उडविणाऱ्या मालवण मधील मुतूथ फिनकोर्प बँकेतील कथित सोने तारण घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी तथा ‘मुथ्थुट फिनकॉर्प’च्या मालवण शाखेच्या मॅनेजर स्नेहा निहाल जामसंडेकर हिला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने तिला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागरिकांनी आयुष्यभराची कमाई, कुटुंबातील दागिने आणि मौल्यवान सोने विश्वासाने तारण ठेवले, मात्र त्याच व्यवहारातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आल्याने मालवणात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोन्याच्या बदल्यात सुरक्षित व्यवहाराची अपेक्षा ठेवणाऱ्या नागरिकांना मोठा आर्थिक धक्का बसल्याचे चित्र आहे.
कोळंब गावच्या सरपंच सिया रामचंद्र धुरी यांच्या तक्रारीवरून दोन दिवसांपूर्वी मालवण पोलिसांनी ‘मुथ्थुट फिनकॉर्प’च्या मालवण शाखेतील मॅनेजरसह चार जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला वेग देत मुख्य संशयित मॅनेजर स्नेहा जामसंडेकर हिला बुधवारी रात्री अटक केली. गुरुवारी तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. प्रकरणाची व्याप्ती, आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीची पद्धत तपासण्यासाठी न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
कोट्यवधींच्या घोटाळ्याचे धागेदोरे कुठे?
या प्रकरणात नेमका किती पैसा कुठे गेला? तारण ठेवलेल्या सोन्याचे पुढे काय झाले? नागरिकांना दाखविण्यात आलेल्या परताव्याच्या व्यवहारामागे नेमकी यंत्रणा काय होती? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
दरम्यान, गुन्ह्यातील उर्वरित तीन संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू असून, मॅनेजरच्या पोलीस कोठडीदरम्यान होणाऱ्या चौकशीत या कथित कोट्यवधींच्या घोटाळ्यामागील आणखी धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे मालवणवासीयांचे लक्ष लागले आहे.







Subscribe to my channel






