आंबेरी दुर्घटना : नदीपात्रात बेपत्ता दर्शन टकारिया यांचा मृतदेह सापडला

दुर्घटना स्थळापासून १०० मीटर अंतरावर सापडला मृतदेह

मालवण : गणेशोत्सवानिमित्त आंबेरी-वाकवाडी येथील सासरवाडीला आलेले मुंबईतील दर्शन चंद्रकांत टकारिया (मूळ रा. गुजरात) हे कर्ली नदीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह दुर्घटना स्थळापासून सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर मिळून आला आहे.

गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. टकारिया कुटुंबातील सदस्यांसोबत ते नदीपलीकडील जुवा येथे शेतीच्या कामासाठी छोट्या होडीने प्रवास करत होते. यावेळी अचानक होडीचे संतुलन बिघडले आणि होडी नदीपात्रात उलटली. त्यामुळे होडीतील चौघेजण पाण्यात पडले. या प्रसंगी होडीचालक स्वप्नील संदीप वाक्कर यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांनी श्वेता टकारिया आणि प्रणल वाक्कर यांना सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र दर्शन टकारिया हे नदीच्या तीव्र प्रवाहात वाहून गेल्याने बेपत्ता झाले होते.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासनालाही माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत, पोलीस, महसूल यंत्रणा, पोलीस पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात होती.

error: Content is protected !!