सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे “ती” दोन्ही कामे मार्गी लागल्याचे समाधान !
नगरसेवक आप्पा लुडबे यांनी मानले प्रशासनाचे आभार
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान जिल्हास्तर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीतवस्ती सुधार योजना सन २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेल्या बसस्थानक ते दलीतवस्ती रस्ता रुंदीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसवणे व डांबरीकरण मंजूर निधी (१५,८१,३५९) तसेच हॉटेल महाराजा ते दलीतवस्ती रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण मंजूर निधी (२३,७६,९९६) ही दोन कामे मंजूर झाली. गुरुवारी या दोन्ही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे मार्गी लागल्याची प्रतिक्रिया नगरसेवक आप्पा लुडबे यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
प्रभागात विविध विकासकामे होत असताना जनतेच्या मागणीनुसार वरील दोन्ही कामेही मंजूर होण्या बाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर दोन्ही कामे मंजूर झाल्याने समाधान असल्याचे आप्पा लुडबे यांनी सांगितले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालिकेच्या वतीने वाहनतळ कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी देखील आपला पाठपुरावा होता, असेही श्री. लुडबे यांनी निदर्शनास आणून दिले.