मालवण – तारकर्ली – देवबाग मार्गावरील शेवटची एस.टी. बस पूर्ववत सुरु करा

मनसेचे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांचे एसटी स्थानकप्रमुखांना निवेदन : मालवण आगारातील १९ गाड्या निर्लेखित झाल्याने गाड्यांचा तुटवडा

नवीन गाड्या उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु : एसटी अधिकाऱ्यांची माहिती : मनसे परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

मालवण : आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलेल्या तारकर्ली आणि देवबाग गावांना जोडणाऱ्या मालवण – तारकर्ली – देवबाग मार्गावरील सायंकाळी ७.१५ वाजताची शेवटची एसटी बसफेरी गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. ही बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी गुरुवारी येथील स्थानकप्रमुखांना निवेदन सादर केले.

या मार्गावरील शेवटची बसफेरी बंद झाल्यामुळे स्थानिक नागरिक, नोकरदार, विद्यार्थी आणि पर्यटकांचे प्रचंड हाल होत असून, त्यांना नाहक आर्थिक व मानसिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याकडे मनसेने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तारकर्ली आणि देवबाग परिसरातील अनेक युवक-युवती, कामगार आणि व्यावसायिक कामानिमित्त दिवसभर मालवण शहरात असतात. बाजारपेठेतील आणि कार्यालयातील कामकाज आटोपून रात्री गावाकडे परतण्यासाठी सायंकाळी ७.१५ ची बस हाच एकमेव हक्काचा आणि सुरक्षित पर्याय होता. मात्र, हीच फेरी अचानक बंद करण्यात आल्यामुळे रात्रीच्या वेळी घरी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे. नागरिकांना आता नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, यामुळे त्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. सध्या पावसाळी वातावरणामुळे अधिकृत पर्यटन हंगाम संपला असला, तरी या भागात वर्षभर पर्यटकांची काही प्रमाणात वर्दळ असते. बसफेरी बंद असल्याने पर्यटकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

निवेदन स्वीकारल्यानंतर स्थानकप्रमुख श्री. गडदे आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आगार प्रशासनाची बाजू मांडताना श्री. गडदे यांनी सांगितले की, मालवण आगारातील तब्बल १९ गाड्या वयोमानानुसार निर्लेखित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या आगारात गाड्यांचा मोठा तुटवडा आहे. या बदल्यात शासनाकडून नवीन दहा गाड्या मंजूर झाल्या आहेत, मात्र त्या अद्याप आगारात दाखल झालेल्या नाहीत. नवीन गाड्या लवकर मिळाव्यात यासाठी वरिष्ठ पातळीवर आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

प्रशासकीय अडचणी समजून घेतल्यानंतर, मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी हा प्रश्न तातडीने सुटणे गरजेचे असल्याचे सांगितले. मालवण आगाराला मंजूर झालेल्या नवीन दहा गाड्या त्वरित मिळाव्यात आणि येथील प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी आपण स्वतः राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे लक्ष वेधणार आहोत आणि त्यांच्याकडे या संदर्भात थेट पाठपुरावा करणार आहोत, असे अन्ननसिएशन यांनी स्पष्ट केले. विस्कळीत झालेली ही बस सेवा लवकर सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांकडून दिला जात आहे.

error: Content is protected !!