मालवणमध्ये भटक्या कुत्र्यांविरोधात नगरपरिषदेची धडक मोहीम

पहिल्याच टप्प्यात २०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण अन् लसीकरण पूर्ण; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन मैदानात

मालवण : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न ऐरणीवर असतानाच मालवण नगरपरिषदेने आता ठोस पाऊल उचलले आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासह नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नगरपरिषदेकडून निर्बीजीकरण व लसीकरणाची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात तब्बल २०० भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर आणि मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेसाठी नागपूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या संस्थेची वार्षिक निविदा प्रक्रियेद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याचा प्रयत्न

शहरातील विविध भागांतून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्यात येत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांचा धोका कमी करण्यास मदत करणे, त्यांच्या संख्येवर दीर्घकालीन नियंत्रण मिळविणे आणि रेबीजसारख्या गंभीर आजारांचा प्रसार रोखणे, हा या मोहिमेमागील प्रमुख उद्देश आहे.

मोहीम थांबणार नाही; पुढील टप्प्यांतही कारवाई सुरू

पहिल्या टप्प्यात २०० कुत्र्यांवर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता पुढील टप्प्यांतही ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याचे नगरपरिषदेचे नियोजन आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ तात्पुरत्या उपायांनी नव्हे, तर सातत्यपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने हाताळण्यावर प्रशासनाचा भर आहे.

भटक्या कुत्र्यांबाबत समस्या आढळल्यास नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, त्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन १८००२३३४३८१ या क्रमांकाशी संपर्क साधावा आणि मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!