बोट सफरीनंतर प्रकृती बिघडली; उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी केले घोषित
मालवण : पर्यटनासाठी मालवणमध्ये आलेल्या मुंबईतील ४२ वर्षीय महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. सौ. अनुश्री भावेश गुहागरकर (वय ४२, रा. चारकोप शिवनेरी, कांदिवली, मुंबई) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पर्यटनासाठी आलेल्या त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भावेश गुहागरकर हे आपल्या कुटुंबीयांसह मालवणमध्ये पर्यटनासाठी आले होते. चिवला बीच येथे जलपर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर बोटीवर असताना अनुश्री यांना उलटी झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. दरम्यान, स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी प्रसंगावधान राखत अनुश्री यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने पर्यटन व्यावसायिकांनीही हळहळ व्यक्त केली असून, गुहागरकर कुटुंबीयांना धीर दिला.
याप्रकरणी पती भावेश गुहागरकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मालवण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जे. एन. डिसोझा करीत आहेत.