संस्थेच्या उभारणीतील आणि शैक्षणिक वाटचालीतील महिलांच्या योगदानाचा गौरव
सावंतवाडी : यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त संस्थेच्या उभारणीत आणि शैक्षणिक प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात संस्थेच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांना ‘बीकेसीच्या तेजस्विनी’ या सन्मानाने गौरविण्यात आले.
यावेळी सुनेत्रा फाटक यांना ‘कर्मयोगी नवदुर्गा’, प्रियंका देसाई यांना ‘संगोपनशील दुर्गा’, प्राची कुडतरकर यांना ‘संस्कृती व नेतृत्वशक्ती’, प्रीती डोंगरे यांना ‘अचूकतेचा आधारस्तंभ’ आणि वैशाली आरोसकर यांना ‘कार्यक्षमतेचा आधारस्तंभ’ म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच मारिया फर्नांडिस, अपर्णा केदार आणि रंजना बोयान यांचा ‘सेवाशक्ती’ म्हणून गौरव करण्यात आला.
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलपासून ते यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या उभारणीपर्यंत संस्थेच्या विविध टप्प्यांवर या महिलांनी दिलेले योगदान, त्यांची मेहनत, समर्पण आणि सेवाभाव यांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.शौर्य केवळ रणांगणावरच नव्हे, तर शिक्षण आणि समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या निष्ठावान सेवेतूनही प्रकट होते, हा प्रेरणादायी संदेश या सोहळ्यातून छात्रसैनिकांना देण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे कमांडंट ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा आणि प्राचार्य सॅव्हीओ फर्नांडिस उपस्थित होते.