मालवण सभापती, उपसभापतींच्या उपोषणामुळे जिल्ह्याला मिळाला न्याय !
सर्व पं. स. ना सेस फंडाची रक्कम दोन टप्प्यात मिळणार
कुणाल मांजरेकर
मालवण : पंचायत समित्यांना मिळणारी सेस फंडाची रक्कम दोन वर्षे न मिळाल्याने राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मालवण पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परूळेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर केलेल्या उपोषणामुळे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना न्याय मिळाला आहे. सर्व पंचायत समित्यांना सेस फंडाची रक्कम दोन टप्प्यात देण्यास प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे. याची कार्यवाही तात्काळ होणार आहे. याबाबतचे लेखी पत्र प्रशासनाने सादर केल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.
पंचायत समित्यांना मिळणारा सेस फंड गेली दोन वर्षे न मिळाल्याने प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मालवण पंचायत समितीचे सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती सतीश उर्फ राजू परुळेकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या उपोषणाला जिल्हा परिषदेचे वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, सुभाष लाड, विरेश पवार यांच्यासह भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.
हे उपोषण यशस्वी ठरले आहे. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करून पहिल्या टप्प्यातील तीन लाख रुपये तसेच दुसऱ्या टप्प्यातील तीन लाख तात्काळ देण्याचे पत्र सादर केले. तसेच यापुढील फंड मिळण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून निधी वर्ग करण्यात येईल, असेही कळविले आहे. या उपोषणाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीना सेस फंड मिळणार आहे.