आठ ते दहा वर्षाच्या तपश्चर्येचे फळ मिळणार ; दांडीत भाजपचे “कमळ” फुलणार

प्रभाग क्र. ९ ब च्या उमेदवार सौ. अन्वेशा अजित आचरेकर यांना विजयाचा विश्वास ; दांडी प्रभाग आदर्शवत बनवणार

मालवण : मालवण नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सौ. अन्वेशा अजित आचरेकर यांना प्रभाग क्र. ९ ब या जागेवरून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. सौ. आचरेकर या एक यशस्वी महिला पर्यटन उद्योजिका असून पुरुषप्रधान व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॉटर स्पोर्ट्स मध्ये त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर आपले अस्तित्व निर्माण केले आहे. मागील आठ ते दहा वर्षात दांडी प्रभागातील जनतेच्या सुखदुःखात त्या सहभागी असून आजवर अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. येथील जनतेची आपण केलेली सेवा यावेळी निश्चितपणे फळाला येणार असून या निवडणुकीत भाजपच्या कमळ निशाणीवर आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दांडी किनारपट्टी वर मच्छिमार समाज मोठ्या संख्येने वसला आहे. मत्स्यव्यवसाय आणि वॉटर स्पोर्ट्स या व्यवसायाशी येथील नागरिक निगडित असून भाजपचे नेते जिल्हयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडेच मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास खाते आहे. त्यांच्या माध्यमातून येथील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावून हा प्रभाग आदर्शवत बनवू असे त्यांनी सांगितले.

शहराचा, राज्याचा किंवा देशाचा सर्वांगीण विकास हवा असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकसंघ नेतृत्व आणि एक विचाराचं शासन. कारण केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिन्ही पातळ्यांवर एकाच विचाराचे सरकार असेल, तर निर्णयप्रक्रिया वेगवान होते, निधी सहज उपलब्ध होतो आणि कोणत्याही योजनेला राजकीय अडथळे निर्माण होत नाहीत. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार कार्यरत आहे. तर जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे प्रशासन व नियोजन विभागाच्या चाव्या आहेत. त्यामुळे मालवण नगरपालिकेवर भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आल्यास विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे सौ. आचरेकर यांनी सांगून आपल्याला प्रचारात उत्स्फूर्त असा जनतेचा प्रतिसाद मिळत असून जनतेतूनच अन्वेषा आचरेकर या आमच्या हक्काच्या नगरसेविका म्हणून विजयी होतील असा विश्वास व्यक्त होत असल्याचे सांगितले.

केंद्रात पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वातील भाजपाचे स्थिर, निर्णायक आणि एकहाती सरकार असताना देशाचा कायापालट घडून आला. स्थिर आणि मजबूत नेतृत्वामुळे कोणतीही तांत्रिक किंवा राजकीय अडचण न येता विकासाचं चक्र गतिमान पद्धतीने फिरू लागलं. पायाभूत सुविधांचे विक्रम, डिजिटल क्रांती, राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन अशा असंख्य योजना सहज राबवता आल्या. विकसित भारताचं स्वप्न साकार होतंय. असेही सौ. आचरेकर म्हणाल्या. राज्यात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार असून लाडकी बहीण सारख्या अनेक योजनांमुळे महिला सबल झाल्या आहेत. मालवण नगरपालिकेवर भाजपची संपूर्ण सत्ता आल्यास शहर विशेषतः दांडी किनारपट्टीला त्याचा मोठा फायदा होईल, असे सौ. अन्वेशा आचरेकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!