
संजना मेस्त्री द्वितीय, धनश्री लाड तृतीय; महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगला नारळी पौर्णिमेचा थरार
मालवण : नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला पारंपरिक खेळाची रंगतदार जोड देत राजकोट किल्ल्यावर रंगलेली नारळ लढवणे स्पर्धा चांगलीच गाजली. नारळाच्या प्रत्येक लढतीसोबत वाढणारा उत्साह, स्पर्धकांचा जल्लोष आणि उपस्थित नागरिकांचा टाळ्यांचा कडकडाट यामुळे संपूर्ण राजकोट परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः महिलांच्या सहभागाने स्पर्धेची रंगत आणखी वाढली. या अटीतटीच्या लढतीत अक्षता आचरेकर यांनी बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. संजना मेस्त्री यांनी द्वितीय, तर धनश्री लाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
राजकोट बॉईज आणि राजकोट मित्रमंडळाच्या वतीने ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आणि युवा उद्योजक सोनू खांदारे यांच्या सौजन्याने विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची पर्वणी ठेवण्यात आली होती. महिला गटातील विजेत्या अक्षता आचरेकर यांना सोन्याची नथ, मिक्सर आणि मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांकाच्या संजना मेस्त्री यांना फ्रीज व पैठणी, तर तृतीय क्रमांकाच्या धनश्री लाड यांना वॉशिंग मशीन व पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळे विजेत्यांच्या आनंदाला चांगलीच उधाण आले.

उद्घाटन सोहळ्यालाही मान्यवरांची उपस्थिती
राजकोट बॉईज आणि राजकोट मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या भव्य नारळ लढवणे स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्य तथा युवासेना नेत्या अपूर्वा किरण सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजकोट किल्ल्याच्या साक्षीने झालेल्या या स्पर्धेत महिला व पुरुष स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेतील प्रत्येक फेरीसोबत वाढणारा थरार पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.
राजकोट किल्ल्यावर उत्साहाचा जल्लोष
या निमित्ताने उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, युवा उद्योजक सोनू खांदारे, सुनील खांदारे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शहर संघटक राजू बिडये, ऋत्विक सामंत, बबन रेडकर, नंदू देसाई, अक्षय मालवणकर, नागेश परब, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, गीता बापर्डेकर, गौरी खांदारे, रूपा बिडये, अनिता फर्नांडिस, मंदा जोशी, नगरसेविका महानंदा खानोलकर, विजू कांदळकर, जॉन नरोना, परशुराम पाटकर, यश कवठकर, दीपक कुडाळकर, विशाल मोडक, अथर्व काळसेकर, सागर खराडे, संदीप गावकर यांच्यासह राजापूर जि.प. सदस्य प्रकाश पोळेकर, प्रतीक मठकर, पंचायत समिती सदस्य अविनाश पराडकर, सुभाष गुरव, अजित नारकर, भरत लाड, जितेंद्र खांबकर, संदीप बारसकर, सुरेश येनारकर, प्रसाद गुरव, सुभाष बापारकर, शाम वाक्कर यांच्यासह विविध पदाधिकारी, राजकोट बॉईज व राजकोट मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.
महिलांची लक्षणीय उपस्थिती आणि स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे राजकोट किल्ल्यावर रंगलेली ही नारळ लढवणे स्पर्धा नारळी पौर्णिमेच्या उत्सवातील खास आकर्षण ठरली.






Subscribe to my channel






