कोकणचा महाउत्सव उद्या : भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सजली

पहाटे ३ वा. पासून दर्शनाला सुरुवात : रात्री ९ ते दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १ वा. पर्यंत दर्शन रांगा असणार बंद

भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळण्यासाठी ग्रामस्थ मंडळाचे विशेष नियोजन ; प्रशासनाचीही समर्थ साथ

मालवण | कुणाल मांजरेकर

कोकणातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणे वाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक यात्रा उद्या सोमवार दि. ९ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. आंगणेवाडी विकास मंडळ, आंगणे कुटुंबीय आणि प्रशासकीय यंत्रणा भाविकांच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाली असून संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे.भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाने विशेष नियमावली जाहीर केली आहे. पहाटे ३ वाजल्यापासून दर्शन, ओट्या भरण्यास सुरवात होणार आहे. रात्री ९ ते १ वाजेपर्यंत धार्मिक विधींसाठी दर्शन बंद राहून. मध्यरात्री १ वाजल्यापासून पुन्हा दर्शनास सुरुवात होणार आहे. ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत भाविकांना ओटी भरता येईल, अशी माहिती आंगणे कुटुंबीय यांनी दिली आहे. या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून अनेक व्हीव्हीआयपी भाविक देखील यंदा आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. तरी सर्वसामान्य भाविक हाच केंद्रबिंदू मानून ग्रामस्थ मंडळाने आपले नियोजन केले असून प्रत्येक भाविकाला जास्तीत जास्त अर्ध्या ते पाऊण तासात दर्शन मिळण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

यात्रेच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई ने मंदिर सजवण्यात आले असून मंदिराचे रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.आंगणेवाडीत दर्शनासाठी एकूण ९ रांगा लावण्यात आल्या आहेत. तसेच व्हीआयपी आणि मंत्र्यांसाठी स्वतंत्र रांगेची सोय करण्यात आली आहे. यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. मालवण आणि कणकवली अशा दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली आहे. एसटी प्रशासनाने रात्रीपासूनच जादा बसेसची सोय केली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा आवारात देवीचा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. संपूर्ण यात्रा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांनी शिस्त आणि संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आंगणेवाडी विकास मंडळ आणि आंगणे कुटुंबीयांनी केले आहे. मंदिरावर करण्यात आलेली विलोभनीय विद्युत रोषणाई आणि मुंबईकर चाकरमान्यांच्या आगमनाने मालवण तालुका सध्या गजबजून गेला आहे.

यात्रेवर आचारसंहितेचे सावट ; परिसर बॅनरमुक्त

आंगणेवाडीची यात्रा म्हणजे चाकर मान्यांची जत्रा म्हणून ओळख ली जाते. या यात्रेनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. त्यामुळे यात्रा परिसर व मार्गात मोठ्या संख्येने भाविकांना शुभेच्छा देणारे बॅनर दिसून येतात. मात्र यंदा यात्रेवर आचार संहितेचे सावट आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ७ फेब्रुवारीला झाल्या असल्या तरी त्याचे निकाल उद्या ९ फेब्रुवारीला जत्रेच्याच दिवशी लागणार असल्याने उद्या संध्याकाळ पर्यंत तरी आचारसंहिता कायम आहे. त्यामुळे किरकोळ अपवाद वगळता यात्रेत बॅनर लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे यात्रा परिसर व रस्ते प्रथमच बॅनर मुक्त झाल्याचे दिसून येते.

error: Content is protected !!