

रेवंडी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
मालवण : कालावल रेवंडी खाडीपात्रात सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटी दरम्यान साचलेला वाळू सदृश्य गाळ काढण्यासाठीची लिलाव प्रक्रिया तातडीने राबवावी, या मागणीसाठी रेवंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले आहे. शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात उपोषणासारखे पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
सह्याद्री पर्वतातून उगम पावणारी गडनदी ‘कालावल खाडी’ म्हणून ओळखली जाते. मात्र, डोंगरावरील जंगलतोडीमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात माती आणि वाळू सदृश्य गाळ वाहून येत आहे. रेवंडी हा भाग खाडीच्या उताऱ्याचा शेवटचा टप्पा असल्याने रेवंडी गावासमोरील किनाऱ्यावर या गाळाचे डोंगर साचले आहेत. ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केल्यानुसार, खाडीपात्र उथळ झाल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यात भरतीचे खारे पाणी लगतच्या दुपीकी शेतजमिनीत घुसल्याने जमिनी नापीक होत आहेत. जमिनीतील खारटपणामुळे गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीही आता खारट होऊ लागल्या आहेत. खाडीपात्र उथळ झाल्याने पावसाळ्यात पुराचे प्रमाण वाढले असून खाडीकाठची जमीन मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. गाळ साचल्यामुळे स्थानिक मच्छिमार आणि व्यावसायिकांना नौका नेणे कठीण झाले आहे.
शासनाकडून या भागाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे, मात्र अद्याप लिलाव प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. ही प्रक्रिया लांबल्यामुळे स्थानिक गरजू आणि बेरोजगार तरुण रोजगारापासून वंचित राहत आहेत. एकीकडे अधिकृत लिलाव थांबलेला असताना दुसरीकडे काही ठराविक लोकांच्या मदतीने छुप्या मार्गाने अनधिकृत वाळू उपसा सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून अधिकृत व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांवर अन्याय होत आहे.
रेवंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की, संबंधित विभागाकडून सर्व्हे अहवाल मागवून घेऊन ‘डुबी हातपाटी’ पद्धतीने गाळ उपसा करण्यासाठी लिलाव प्रक्रिया तातडीने सुरू करावी. भविष्यात उत्तरांचलसारखी नैसर्गिक आपत्ती ओढवू नये, यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे.प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रेवंडीवासीयांनी दिला आहे. यावेळी रेवंडी सरपंच अमोल वस्त, माजी सभापती सोनाली कोदे, उपसरपंच श्रद्धा वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य विराज तळाशीलकर, संतोष कांबळी, मेघना कांबळी, माजी सरपंच युवराज कांबळी, शैलेश कांबळी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.



Subscribe to my channel




