राणेसाहेब आमचे कुटुंबप्रमुख, वैभव नाईकांनी आमच्यात लुडबुड करू नये !
सुदेश आचरेकर यांचा सल्ला : राणेसाहेबांवर बोलून फसवणूक करण्याचे दिवस आता संपले
स्वतःच्या मतदार संघाची दुर्दशा पहा ; नाहीतर भविष्यात पश्चात्तापाची वेळ येईल
कुणाल मांजरेकर
मालवण : संपूर्ण महाराष्ट्रात राणेसाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या वक्तव्यामध्ये आपुलकीयुक्त दरारा असून राणेसाहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. त्यामुळे एखादा कार्यकर्ता चुकीचा वागला, चुकला तर त्याला बोलण्याचा, त्याच्यावर रागावण्याचा संपूर्ण अधिकार त्यांना आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये काय चालतंय, त्यामध्ये लुडबुड करण्याचे उपद्व्याप आमदार वैभव नाईक यांनी बंद करावेत. स्वतःच्या पक्षामध्ये किती गटबाजी आहे, आणि किती गळती आहे याचे आत्मपरीक्षण करा. स्वतःच्या मतदार संघाची झालेली दुर्दशा याकडे लक्ष द्या, अन्यथा भविष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असा सल्ला भाजप नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. राणे कुटुंबियांच्या वक्तव्यावरून जनतेला विचलित करण्याचे प्रकार वैभव नाईक यांनी थांबवावेत. राणे साहेबांवर बोलून, जनतेची फसवणूक करून मते मागण्याचे दिवस आता संपलेत, असेही श्री. आचरेकर म्हणाले.
मालवण येथील पत्रकार परिषदेत बोलताना सुदेश आचरेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. मालवण- कुडाळ मतदार संघाची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे वैभव नाईक यांचे लक्ष नाही. राणेसाहेब हे राष्ट्रीय नेतृत्व आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार वैभव नाईक यांना नाही. राणेसाहेबांनी शिवसेना सोडली नाही तर बाळासाहेबांचे कान फुंकणाऱ्यांमुळे बाळासाहेबांनी पुत्र प्रेमापोटी स्वतःची इच्छा नसतानाही नारायण राणे यांना पक्षातून काढून टाकले, हे सर्वश्रुत आहे. शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये राणेसाहेबांनी नऊ वर्षे प्रामाणिकपणे काम केले. मात्र पक्षनेतृत्वाने त्यांच्याशी काही कमिटमेण्ट केली होती, ते शब्द न पाळल्याने राणे साहेबांना काँग्रेस पक्षातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या सामर्थ्यातून नवीन पक्षाची स्थापना केली आणि आपली ताकद आणि आपले सामर्थ्य संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले. म्हणूनच भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाने राणेसाहेबांना सन्मानाने आपल्या पक्षात घेतले.
वैभव नाईक यांनी गद्दारीवर आत्मपरीक्षण करावे, आचरेकर यांचा सल्ला
ज्या पक्षात राणेसाहेब गेले, त्या पक्षाशी ते प्रामाणिक राहिले. पण ज्यांच्या नसानसात गद्दारी आहे, त्यांना स्वत:प्रमाणे दुसरी व्यक्ती गद्दारच वाटणार. खासदारकीच्या निवडणूकीत कोणी गद्दारी केली, ते तुमच्या खासदारांना माहीत आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूकीत संदेश पारकर यांच्याशी कोणी गद्दारी केली, ते कणकवलीसह जिल्हयातील जनतेने त्यावेळी अनुभवले आहे. त्यामुळे दुसऱ्यावर शिंतोडे उडवण्यापूर्वी आपण किती प्रामाणिक आहोत, याचे आत्मपरीक्षण वैभव नाईक यांनी करावे, असे सुदेश आचरेकर म्हणाले.