सुशांत नाईकांवर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी !
कुणाल मांजरेकर
जिल्हा बँकेच्या निवडणूकीत जाईन्ट किलर ठरलेल्या शिवसेना उमेदवार सुशांत नाईक यांच्यावर पक्षाने नवीन जबाबदारी दिली आहे. युवा सेनेच्या कणकवली विधानसभा मतदार संघाच्या जिल्हा युवा अधिकारी पदी सुशांत नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना आमदार वैभव नाईक यांचे बंधू असलेले सुशांत नाईक हे कणकवली नगरपंचायत मध्ये नगरसेवक पदी कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याविरोधात सुशांत नाईक यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणूकीत राजन तेली यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारापुढे टिकाव धरणे अशक्य असताना सुशांत नाईक यांनी राजन तेली यांचा या निवडणुकीत अनपेक्षित पराभव केला. यामुळे जिल्हा बँक निवडणुकीतील जाईन्ट किलर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या राजकीय क्षेत्रातील या वाटचालीमुळे प्रेरित होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या कणकवली विधानसभा मतदार संघाच्या जिल्हा युवा अधिकारी पदी सुशांत नाईक यांची वर्णी लावली आहे. याचवेळी जिल्हा समनव्यकपदी गीतेश कडू यांचीही निवड झाली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या असून सहा महिन्यानंतर या पदाधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांची नियुक्ती कायम केली जाणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.