सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी डॉ. अमोल शिंदे

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शिंदे यांची नियुक्ती; शासनाचा आदेश जारी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथील प्राध्यापक डॉ. अमोल शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबतचा आदेश १८ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केला आहे.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता पद रिक्त असल्याने या पदाचा अतिरिक्त कार्यभार शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अनंत दवंगे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. शासनाच्या नव्या निर्णयानुसार डॉ. अमोल शिंदे यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आला आहे.

डॉ. अमोल शिंदे हे बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात न्यायवैद्यकशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या सध्याच्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या सांभाळून सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे कक्ष अधिकारी प्रवीण कांदे यांनी या आदेशावर डिजिटल स्वाक्षरी केली आहे. ही नियुक्ती पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.डॉ. शिंदे यांच्याकडे सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्यामुळे महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!