तलाठी कंठाळे यांचे वाळू माफियांशी साटेलोटे ? कालावल ग्रामस्थांच्या आरोपामुळे खळबळ !
ग्रामस्थांनी पकडून दिलेला वाळूचा डंपर बनावट पास देऊन सोडल्याचा आरोप ; “तो” डंपर पुन्हा ताब्यात घेऊन दोषींवर कारवाईची मागणी
आचरा पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी ; वाळू माफियांना पोलिसांनीच परस्पर विरोधी तक्रार देण्यास भाग पाडल्याचा आरोप
अंथरुणावर खिळून असलेल्या ७२ वर्षीय वृध्द महिलेवर देखील गुन्हा दाखल ?
कुणाल मांजरेकर
मालवण : अनधिकृत वाळू उत्खननावरून काही दिवसांपूर्वी कालावल हुरासवाडी येथे ग्रामस्थ आणि वाळू माफियांमध्ये हाणामारी झाली होती. यावेळी ग्रामस्थांनी अनधिकृत वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून दिला होता. पण दुसऱ्या दिवशी तलाठी कंठाळे यांनी या वाळूचा पास असल्याचे दाखवत हा डंपर सोडला. मात्र तलाठी कंठाळे यांनी खोटा पास देऊन हा डंपर सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत तहसीलदारांकडे काही कागदपत्रे देत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत आचरा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणी आचरा पोलिसांनीच वाळू माफियांना परस्पर विरोधी तक्रार देण्याची सूचना केली असून अंथरुणावर खिळून असलेल्या एका ७२ वर्षीय वृद्ध महिलेवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सदरील डंपर ताब्यात घेऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा वाळू माफिया आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी या निवेदनातून दिला आहे.
कालावल हुरासवाडी येथे ६ ऑक्टोबर रोजी रात्री अनधिकृत वाळू उपशावरून ग्रामस्थ आणि वाळू व्यावसायिकांमध्ये वाद झाला होता. यावेळी ग्रामस्थांनी वाळू वाहतूक करणारा डंपर रोखून तो पोलिसांच्या ताब्यात दिला होता. मात्र या डंपरमधील वाळूचा पास असल्याचे सांगून तलाठी कंठाळे यांनी हा डंपर सदरील मालकाच्या ताब्यात दिला. परंतु, या कृतीला ग्रामस्थांनी आक्षेप घेत तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत सदरील पास बनावट असल्याचे सांगत याबाबत काही कागदपत्रे सादर केली आहेत.
स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी आचरा यांना सांगूनही येथील अनधिकृत वाळू उपशावर कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या कृतीमुळे वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांची मुजोरी वाढलेली असून ते ग्रामस्थांना धमकावत आहेत. यांस संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी या निवेदनात केला आहे.
६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० ते ७.०० या दरम्यान परप्रांतीय कामगारांची एक होडी वाळू उपसा करण्यासाठी खाडीपात्रात गेली व १० वाजता वाळू उपसा करुन किनाऱ्यालगत आली. त्यावेळी गाडी क. MH07C6049 हा डंपर वाळू भरण्यासाठी आला व वाळू भरून निघत असताना रात्री ११.३० च्या दरम्याने स्थानिक ग्रामस्थांनी वायंगणी हुरासवाडी गडगेवाडी येथे ब्राम्हणदेव मंदिराजवळ गाडी थांबवून त्यांना जाब विचारला. त्यावेळी त्याठिकाणी गणेश लक्ष्मण तोंडवळकर, रा. तोंडवळी व इतर २५ ते ३० जणांचा जमाव स्थानिक ग्रामस्थांच्या व महिलांच्या अंगावर धावून आला. व धक्काबुक्की व मारहाण करण्यास सुरुवात केली. स्थानिक महिलांना मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर ग्रामस्थांमधून प्रशांत सावंत यांनी पोलीस स्टेशन आचरा यांना फोन करुन सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर अर्ध्या तासानंतर पोलीस, वायंगणी तलाठी यांना घेवून जागेवर हजर झाले व वरील क्रमांकाचा वाळूने भरलेला डंपर योग्य ती कार्यवाही करतो असे ग्रामस्थांना सांगून आचरा पोलीस ठाणे येथे घेवून गेले व आपली याबाबत काही तकार असल्यास ग्रामस्थांना उद्या पोलीस ठाणे येथे या असे सांगितले. या सर्व प्रकरणावर ग्रामस्थांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शासन यंत्रणा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी पकडलेला डंपर महसूल प्रशासनाने दाखवलेल्या पावती वरुन गाडी महसूलच्या ताब्यात दिल्याचे पोलीसांनी सांगितले. मात्र सदर पावती पाहिली असता तलाठयाने वाळू साठा अनधिकृत पकडलेला होता, त्याचा लिलाव ६ ऑक्टोबरला दुपारी करण्यात आलेला होता व तसा पास तलाठयाने दिलेला होता. त्यानंतर सदर लिलावाची वाळू संबंधित गाडीतून रात्री ११.३० वाजता वाहतूक केली जात असल्याचे तलाठी कंठाळे यांनी सांगितले. मात्र जर वाळू अधिकृत होती तर सदर डंपरसोबत २५ ते ३० जणांचा जमाव का आला होता ? तसेच जर वाळू अधिकृत होती तर ज्यावेळी मारहाणीची घटना घडल्यानंतर पोलीस तलाठी कंठाळे यांना घेवून आले त्यावेळी तलाठी कंठाळे यांनी सदर वाळू अधिकृत असल्याचे पोलीस व ग्रामस्थ यांना का सांगितले नाही ? गाडी कारवाई करण्यासाठी का घेवून गेले ? त्यामुळे तलाठी कंठाळे हे संबंधित वाळू माफियांच्या बाजूने पेपर वर्क करुन वाळू माफियांच्या पाठीशी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत महसूल प्रशासनाने तलाठी कंठाळे यांनी केलेला वाळूचा लिलाव तसेच त्या वाळूवर लावलेला दंड तसेच वाळू वाहतूक करण्यासाठी दिलेली परवानगी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
८ ऑक्टोबर रोजी तलाठी कंठाळे व मंडळ अधिकारी आचरा यांनी पोलीस पाटील वायंगणी व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत ६ ऑक्टोबर रोजी तलाठी कंठाळे यांनी केलेल्या वाळू लिलावाच्या जागेचा पंचनामा केला असता या जागेवर ६ ऑक्टोबर रोजी लिलाव केलेला वाळूसाठा तसाच आढळून आला. त्यामुळे ६ ऑक्टोबर रोजी गाडी क. MH07C6049 या गाडी मधून केलेली वाळू वाहतूक ही खाडीतून अनधिकृतपणे उपसा केलेली वाळू होती, असा आरोप ग्रामस्थांनी करत कोणत्या कारणाने तो डंपर सोडण्यात आला ? प्रशासनाची दिशाभूल करुन वाळूने भरलेला डंपर आणि वाळू माफियांना ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनास आदेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात ग्रामस्थांनी शासनाचा महसूल बुडवू पाहणाऱ्या वाळू माफियां विरोधात शासकीय यंत्रणेस साथ दिली असून त्यावर पोलीस यंत्रणे मार्फत स्थानिक ग्रामस्थ व महिलांवर वाळू माफियांच्या सांगण्यावरुन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. संबंधित सर्व शासकीय यंत्रणेतील अधिका-यांची याबाबत सखोल चौकशी व्हावी व प्रशासनाची दिशाभूल करणा-या अधिकारी व वाळू माफियांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा याबाबत वाळू माफिया व महसूल प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
… तर ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार : धोंडू चिंदरकर
कालावल मध्ये पोलीस आणि महसूल विभागाने वाळू माफियांना सॉफ्ट कॉर्नर दिल्याचे जाणवून येत आहे. राज्य शासनाच्या आशिर्वादामुळेच हे प्रकार वाढले असून भारतीय जनता पार्टी या घटनेचा निषेध करत आहे. पोलीस आणि महसूल यंत्रणेने या प्रकरणी सखोल तपास करुन दोषींवर कारवाई करावी तसेच खोटा पास दाखवून नेलेला डंपर पुन्हा आणावा. अन्यथा येत्या दोन दिवसांत कालावल ग्रामस्थ तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करतील, तसेच याप्रश्नी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे लक्ष वेधले जाईल, असा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिला आहे.