
पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा वैभव नाईक यांचा आरोप
वेंगुर्ला : निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफर घडविणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मंडळाने आय.व्ही. ॲक्टअंतर्गत प्रवासी वाहतुकीस बंदी घातल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून जलसफरीच्या माध्यमातून रोजगार मिळविणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्थानिकांचा पर्यटन व्यवसाय बंद करून तो धनदांडग्यांच्या हाती देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
वेंगुर्ला परिसरातील निवतीसह विविध पर्यटनस्थळे स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. मात्र, आता अत्याधुनिक बोट प्रकल्पाच्या माध्यमातून हा व्यवसाय मोठ्या व्यावसायिकांच्या हाती देण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याला शिवसेनेचा विरोध राहील, असे नाईक यांनी स्पष्ट केले.
स्थानिक पर्यटन व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफर घडवून आणत आहेत. त्यामुळे केवळ नियमांचा आधार घेत जलसफर बंद करण्याऐवजी स्थानिक व्यावसायिकांना विश्वासात घेऊन सुरक्षितता आणि नियमांचे पालन सुनिश्चित करणाऱ्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नाईक यांनी केली.
सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय स्थानिकांच्या हातातून काढून मोठ्या व्यावसायिकांच्या हाती देण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही. देवबाग, तारकर्ली, वेंगुर्ला-निवती आणि मालवण परिसरातील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांवर अन्याय झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला.






Subscribe to my channel






