जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती; जिल्ह्यातून सुमारे १५० पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार
सिंधुदुर्ग : कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या गोकुळ दूध संघासंदर्भात सुरू असलेल्या संघर्षाला आता सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला आहे. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शेतकरी बांधवांनी संघर्ष आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सुमारे १५० पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली.
लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला गोकुळ दूध संघ हा देशातील अग्रगण्य दुग्धसंघांपैकी एक आहे. या संघाच्या प्रगतीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. अलीकडेच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत अतिरिक्त संचालक नियुक्तीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षाकडून सभासदांच्या कौलावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकरी गटाकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि सहकार क्षेत्रातील लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर संघर्ष आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील जवळपास १५० कार्यकर्ते कोल्हापुरात उपस्थित राहून शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचे अरविंद मोंडकर यांनी स्पष्ट केले.





Subscribe to my channel




