महाडीबीटी २.० प्रणालीवर मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा शुभारंभ; मच्छीमार, मत्स्यशेतकरी व व्यावसायिकांना मोठा दिलासा
मुंबई : राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे महाडीबीटी २.० प्रणालीवर या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.
राज्य शासनाकडून ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या योजनांच्या अंमलबजावणीत सुलभता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी Government Process Re-engineering (GPR) अंतर्गत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
घरबसल्या अर्ज करता येणार
नवीन ऑनलाइन सुविधेमुळे लाभार्थ्यांना योजनांसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहेत. यासाठी कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची तसेच अनावश्यक ऑफलाइन कागदपत्रे सादर करण्याची गरज कमी होणार आहे. आवश्यक माहिती शासकीय डेटाबेसमधून उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून, विविध प्रमाणपत्रेही ऑनलाइन स्वरूपात मिळणार आहेत.
अनुदान थेट बँक खात्यात
योजनेअंतर्गत मंजूर होणारे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहे. त्यामुळे अनुदान वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून, लाभार्थ्यांना योजनांचा लाभ अधिक जलद आणि प्रभावीपणे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कमी कागदपत्रे, सुलभ अर्ज प्रक्रिया आणि ऑनलाइन सेवा यामुळे राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी संबंधित लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत उपलब्ध योजनांची माहिती घेण्यासाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी २.० या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळ – https://mahadbt2.maharashtra.gov.in/




Subscribe to my channel




