
नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास; कुणकेश्वर, पवनचक्की गार्डन आणि देवगड-निपाणी मार्गाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या चौकाचे होणार सुशोभीकरण
देवगड : देवगड शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ‘Y’ जंक्शनच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विविध संस्था, संघटना आणि व्यापारी वर्गाकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत हा निधी उपलब्ध करून दिला आहे.
सिंधू रत्न योजनेतून उपलब्ध झालेल्या या निधीतून देवगड एसटी बसस्थानकाच्या कोपऱ्याची शासनाच्या ताब्यातील जागा वापरून आकर्षक सर्कल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच वाहतुकीच्या दृष्टीनेही आवश्यक सुविधा निर्माण होणार आहेत.
देवगड-निपाणी रस्त्याच्या विकासकामाला ‘Y’ जंक्शनच्या सुशोभीकरणाची जोड मिळणार आहे. या ठिकाणी सर्कल उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक, व्यापारी तसेच विविध संस्था-संघटनांकडून केली जात होती. आता या मागणीला मूर्त स्वरूप मिळणार आहे. ‘Y’ जंक्शनमधून एक मार्ग देवगड-निपाणी रस्त्याला, तर दुसरा कुणकेश्वरच्या दिशेने जातो. याच मार्गावर पवनचक्की आणि पवनचक्की गार्डन असल्याने पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे या महत्त्वाच्या चौकाचे नियोजनबद्ध सुशोभीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.
देवगडची ओळख सांगणारा स्टॅच्यू ठरणार आकर्षण
प्रस्तावित सर्कलमध्ये देवगडची वैशिष्ट्यपूर्ण ओळख अधोरेखित करणारा स्टॅच्यू उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे सर्कल केवळ वाहतूक व्यवस्थेचा भाग न राहता देवगडच्या सौंदर्यात भर घालणारे आकर्षण ठरणार आहे.
किल्ला, समुद्रकिनारा, पवनचक्की आणि पवनचक्की गार्डन यांसारख्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावरील महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून ‘Y’ जंक्शनचे महत्त्व आहे. ८५ लाखांच्या निधीतून होणाऱ्या या कामामुळे देवगड शहरातील महत्त्वाच्या चौकाचे रूप पालटणार असून, नागरिक व व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.







Subscribe to my channel






