दांडी किनाऱ्यावर कचरा उचल करण्यासाठी दररोज दोन कर्मचाऱ्यांसह ट्रॅक्टर द्यावा : सौ. अन्वेशा आचरेकर यांची मागणी



मालवण : मालवण शहरात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण गणल्या गेलेल्या मालवण दांडी समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेबाबत मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सौ अन्वेषा आचरेकर यांनी मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती सौ पूनम चव्हाण यांचे लक्ष वेधले. यानंतर सौ. आचरेकर आणि सौ. चव्हाण यांनी तात्काळ अधिकाऱ्यांसमवेत दांडी समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली. यावेळी सौ. आचरेकर यांनी दांडी किनारपट्टीवर दररोज दिवसभरासाठी कचरा उचल करण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांसह ट्रॅक्टर द्यावा जेणेकरून दांडी किनारपट्टी स्वच्छ राहील, अशी मागणी केली. यावर सौ. चव्हाण यांनी याबाबत प्राधान्याने विचार करू अशी ग्वाही दिली.
मालवण शहर हे पर्यटन दृष्ट्या महत्वाचे मानले गेले असून मालवणात देशी विदेशी पर्यटकांची कायम रेलचेल असते. मालवणात येणारे पर्यटक हे सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच खासकरून इथल्या समुद्र किनाऱ्यांची निवड करतात. किल्ले सिंधुदुर्गच्या समोर दांडी बीच असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गची पायाभरणी केलेला मोरयाचा धोंडा या ठिकाणीही पर्यटक भेट देतात. दांडी किनारपट्टीवर दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असून येथील कचरा उचल होण्यासाठी दररोज दोन कर्मचाऱ्यांसह ट्रॅक्टर कार्यरत असणे आवश्यक आहे. त्यामुळे याठिकाणी या गोष्टीची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी सौ. अन्वेषा आचरेकर यांनी केली. या पहाणीच्या वेळी शिवसेना नगरसेवक महेश कोयडे , सुपर वायझर पवन धुरी स्वच्छता मुकादम श्री. वळंजू आदी उपस्थित होते.

Subscribe to my channel




