मालवणच्या शासकीय रुग्णालयातील आरोग्यसेवेवर प्रश्नचिन्ह; १२ दिवसांपासून एक्स-रे तंत्रज्ञ गायब, स्त्रीरोग तज्ज्ञही नाही!

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसीएशन यांची तातडीने वैद्यकीय सुविधा सुरळीत करण्याची मागणी

मालवण : शहरातील शासकीय रुग्णालयात मागील १२ दिवसांपासून एक्स-रे तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच स्त्रीरोग तज्ज्ञही उपलब्ध नसल्याने महिला रुग्ण आणि विशेषतः गर्भवती महिलांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णांच्या हिताचा विचार करून दोन्ही महत्त्वाच्या वैद्यकीय सेवा तातडीने सुरळीत कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसीएशन यांनी केली आहे.

मालवण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आवश्यक तपासण्यांसाठी एक्स-रेची सुविधा महत्त्वाची आहे. मात्र, मागील १२ दिवसांपासून एक्स-रे तंत्रज्ञ उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा प्रभावीपणे मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी रुग्णांना तपासणीसाठी खासगी रुग्णालये अथवा इतर ठिकाणी जावे लागत असून, त्याचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

यासोबतच रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे महिला रुग्णांचीही मोठी गैरसोय होत आहे. गर्भवती महिला तसेच स्त्रीरोगाशी संबंधित रुग्णांना आवश्यक वैद्यकीय तपासणी, सल्ला आणि उपचार वेळेत मिळणे गरजेचे असताना तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुपलब्धतेमुळे अडचणी निर्माण होत असल्याचे अन्ननसीएशन यांनी निदर्शनास आणले.

या संदर्भात वैद्यकीय अधीक्षकांकडे निवेदन देत एक्स-रे तंत्रज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यांची तातडीने नियुक्ती किंवा उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच एक्स-रे तंत्रज्ञ मागील १२ दिवसांपासून उपलब्ध का नाही, याचे कारण स्पष्ट करून ही समस्या भविष्यात पुन्हा निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आधारस्थान असल्याने तेथील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा अखंडित राहणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन रुग्णांना वेळेत आवश्यक तपासणी व उपचार मिळतील, याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा गॅरी अन्ननसीएशन यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!