सोमवार आठवडा बाजारादिवशी बाजार परिसरात वाहतुकीचे नियोजन करा

शिवसेनेच्या नगरपालिकेतील गटनेत्या पूनम चव्हाण यांची पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्ग येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजारावेळी वाहतूक कोंडीचा फार मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आठवडा बाजारा दिवशी बाजार परिसरात वाहतुकीचे नियोजन करण्याची मागणी शिवसेनेच्या मालवण नगरपालिकेतील गटनेत्या सौ. पूनम चव्हाण यांनी पोलीस निरीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी उप

नगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्यासह नगरसेवक सहदेव बापर्डेकर, सिद्धार्थ जाधव, नगरसेविका मेघा गावकर, अश्विनी कांदळकर, शेखर गाड, अमित सावंत आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, मालवण शहराच्या प्रवेशद्वारा जवळील परिसरात आठवडा बाजार भरला जातो आणि त्यादिवशी त्याठिकाणी रस्त्याच्या (सागरी महामार्ग) दोन्ही बाजुंनी भाजी विक्रेते तसेच इतर व्यापारी आपला भाजीपाला तसेच इतर विक्रीचा माल घेवून बसलेले असतात. तसेच बाजारासाठी आलेले ग्राहक, नागरीक यांची मोठी वर्दळ त्याठिकाणी असते आणि अशी गर्दीची परिस्थिती असताना त्याठिकाणी अवजड वाहने दोन्ही बाजुने ये-जा करीत असतात आणि त्यावेळी त्याठिकाणी वाहतुकीचा मोठा अडथळा होत असतो. तसेच काही ना काही लहानमोठे अपघात घडत असतात आणि त्यातून दुखापत होते. तसेच वादाचे मुद्दे निर्माण होत असतात. तरी त्याठिकाणी त्या एक दिवसापुरता वाहतुकीचा आपल्या पध्दतीने पर्यायी मार्ग काढावा. आडारी रोड ते सागरी महामार्ग अशी व्यवस्था करावी. आपणांस व्यापारी व सर्व नागरिकांच्यावतीने ही विनंती करीत आहे. त्यावर आपण गांर्भीयाने विचार कराल आणि वाहतुकीचे नियोजन कराल अशी खात्रीशीर आशा आहे, असे सौ. चव्हाण यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!