मालवण नगरपालिकेत २५ वर्षात झाला नाही एवढा दोन वर्षात भ्रष्टाचार !

शिवसेना उपतालुकाप्रमुखाकडून “घरचा आहेर” ; महेश जावकर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत जाहीर नाराजी

शिवसेनेत आलेल्या राणे समर्थकांकडून स्वतःची घरे भरण्यासाठी पालिकेच्या निधीचा वापर : लवकरच भांडाफोड करणार

कुणाल मांजरेकर

मालवण : भाजपा नेते नारायण राणे यांचे समर्थक असलेल्या माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर मालवण तालूका शिवसेनेत अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर यांनी या प्रवेशाबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत २००५ मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर दांडा मारणाऱ्यांचे आज पक्षात स्वागत होत असताना कुणीच काही बोलत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. मागील दोन वर्षात शिवसेनेत दाखल झालेल्या राणे समर्थकांकडून नगरपालिकेच्या निधीचा वापर फक्त स्वतःची घरे भरण्यासाठी आणि ठेकेदारांकडून पिग्मी गोळ्या करण्यासाठी होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मागील २५ वर्षात झाला नाही, एवढा भ्रष्टाचार या दोन वर्षात मालवण नगरपालिकेत झाल्याचे सांगत गणेश कुडाळकर यांनी नगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. आपण आपल्या पदाचा वरिष्ठांकडे राजीनामा दिला आहे. त्याचे काय करायचे याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे सांगतानाच दोन वर्षात शिवसेनेतील राणेसमर्थक नगरसेवकांनी नगरपालिकेत राहून पिग्मी कशी गोळा केली, ते लवकरच जनतेसमोर मांडणार असल्याचा इशाराही श्री. कुडाळकर यांनी दिला आहे.

माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी काल युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर सोशल मीडिया वरून निष्ठावंत शिवसैनिकांकडून या प्रवेशाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्‍वभूमीवर उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर यांनी प्रसिद्धीपत्रक देत या नाराजीला वाचा फोडली आहे. या पत्रकात यांनी म्हटले आहे की, मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि मालवण तालुक्यात माझ्यासारखे अनेक शिवसैनिक आहेत ते आता नाराज आहेत. ते का नाराज आहेत त्याचा विचार वरिष्ठ पदाधिकारी आणि नेते यांनी त्याचा विचार करावा. ते २००५ या वर्षा पासून किंवा त्याही अगोदर पासून शिवसेना पक्षाचे काम निष्ठेने करत आले आहेत. त्यांना नाराज करुन वरिष्ठ पदाधिकारी काय साध्य करु पाहत आहेत याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. कधी नाही ते मालवण तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून गटातटाचे राजकारण सुरू झाले. आंगणेवाडी जत्रेला शिवसेना पक्षाची दोन कार्यालये होतात. एक सर्वात जुनं असं निष्ठावंत शिवसैनिक यांचं कार्यालय आणि दुसरं राणे समर्थक शिवसैनिक यांचं. राणे समर्थक शिवसैनिक शिवसेनेत आले आहेत तो फक्त आपला धंदा म्हणून आणि पिग्मि गोळा करण्यासाठी. मालवण नगरपालिकेत विकास निधी मागील २५ वर्षात एवढा कधीही आला नव्हता तेवढा निधी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून शहर विकासासाठी उपलब्ध करून दिली आहे. पण मागील दोन वर्षापुर्वी शिवसेना पक्षात प्रवेश केलेले राणे समर्थक शिवसैनिक तो निधी स्वत:ची घरे भरण्यासाठी करत आहेत आणि ठेकेदार यांच्या कडून मोठ्या प्रमाणात पिग्मी गोळा करत आहेत. याचा विचार मालवणच्या जनतेने करावा हीच मालवण शहर नागरीकांकडून अपेक्षा आहे.

राणे समर्थक शिवसैनिक आणि नविन शिवसेनेत प्रवेश केलेला माजी नगरसेवक महेश जावकर यांना पुन्हा निवडून येऊन नगरपालिका लुटायचा राणे समर्थक शिवसैनिक दलाल आणि पिग्मीं एजंट यांचा डाव आहे. दोन वर्षात राणे समर्थक शिवसैनिक यांनी मोठ्या प्रमाणात नगरपालिकेत राहुन पिग्मी कशी गोळा केली आहे ती मी मालवणच्या जनतेसमोर काहीच दिवसात मांडणार आहे. मालवणच्या नगरपालिकेत गेल्या २५ वर्षात कधीही एवढा मोठा भ्रष्टाचार झाला नव्हता तो गेल्या दोन वर्षांत झालेला आहे.

राहिला प्रश्न माझा, मी माझ्या पदाचा राजीनामा वरिष्ठ पदाधिकारी यांच्या जवळ पाठवला आहे. तो काय तो निर्णय वरिष्ठ पदाधिकारी घेतील. मी कधीही पक्षाच्या उमेदवारीसाठी किंवा कोणत्याही पदासाठी इच्छुक नव्हतो. पण मी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आहे आणि याही पुढे शिवसैनिक म्हणून असणार आहे. मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि माझं शिवसैनिक हे पद कोणीही काढु शकत नाही. पण जेथे तेथे अन्याय होत असेल त्याठिकाणी अन्याया विरुद्ध लढण्यासाठी मी शिवसैनिक म्हणून कायम असेन. काल जो शिवसेना पक्षात महेश जावकर यांचा प्रवेश करुन घेतला गेला आहे त्याला प्रत्येक शिवसैनिक आणि मालवण शहरातील, तालुक्यातील जनतेचा विरोध आहे

“त्यांचा” नगरपालिका लुटण्याचा डाव

२००५ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मालवणच्या दौऱ्यावर असतेवेळी त्यांच्या गाडीवर लाकडी दांडा फेकून मारला आणि काळे झेंडे दाखवलेत अशा व्यक्तींना शिवसेना पक्षात सन्मानपुर्वक प्रवेश दिला जातो. त्या मागचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त राणे समर्थक शिवसैनिक यांचा मालवण नगरपालिका लुटण्याचा डाव आहे. याचा निष्ठावंत शिवसैनिकांनी व मालवणच्या जनतेने यांचा विचार करावा, असे आवाहन गणेश कुडाळकर यांनी केले आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!