मालवणमध्ये महसूल विभागाची पहाटे धडक कारवाई!

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त; कोळंब खडवण नाक्यावर कारवाईने खळबळ!

मालवण : तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोळंब खडवण नाका येथे छापा टाकून अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे बेकायदेशीर वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या डंपरचे क्रमांक GA 04 T 3851, GA 04 T 3147 आणि MH 07 AQ 8118 असे आहेत. या मोहिमेत मंडळ अधिकारी दीपक शिंगरे (मसुरे), मीनल चव्हाण (कोळंब), उमेश सिंगनाथ (आचरा), स्वप्नात जंगले (सुकळवाड), ग्राम महसूल अधिकारी खुलपे व गुरव तसेच महसूल सेवक सत्यवान पाताडे, वैभव मसुडगे आणि संतोष चव्हाण यांनी सहभाग घेतला.

पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या या धडक कारवाईतून महसूल विभागाने अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील बेकायदेशीर वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

error: Content is protected !!