आंध्रच्या बंदर विकास मॉडेलचा महाराष्ट्रासाठी अभ्यास

मंत्री नितेश राणे यांची आंध्रचे बंदरे मंत्री बी. सी. जनार्दन रेड्डी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक

बंदरे, उद्योग, मत्स्यव्यवसाय व किनारी पर्यटनाच्या एकात्मिक विकासावर भर

विजयवाडा (आंध्रप्रदेश) : आंध्रप्रदेशच्या सागरी व बंदर-केंद्रित विकास मॉडेलचा अभ्यास करून महाराष्ट्रातील सागरी अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेश सरकारचे पायाभूत सुविधा व गुंतवणूक तसेच रस्ते व इमारती व बंदरे विभागाचे मंत्री बी. सी. जनार्दन रेड्डी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. आंध्र प्रदेशच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान झालेल्या या बैठकीत ग्रीनफिल्ड बंदरांचा विकास, जहाजबांधणी व जहाज दुरुस्ती क्लस्टर्स, आधुनिक मत्स्यबंदरे, अंतर्देशीय जलमार्ग, वॉटर मेट्रो, किनारी पर्यटन, बंदर कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.

बंदरांचा केवळ मालवाहतुकीसाठी वापर न करता त्याभोवती उद्योग, रोजगार, मत्स्यव्यवसाय, जहाजबांधणी, लॉजिस्टिक्स आणि किनारी पर्यटनाची व्यापक परिसंस्था उभी करण्याच्या आंध्र प्रदेशच्या दृष्टिकोनाचा यावेळी अभ्यास करण्यात आला. बंदर विकासाच्या माध्यमातून औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे सादरीकरणही करण्यात आले.

महाराष्ट्रासाठी उपयुक्त बाबींचा अभ्यास

महाराष्ट्राची विस्तीर्ण किनारपट्टी, बंदरे, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटनाची क्षमता लक्षात घेता आंध्र प्रदेशच्या अनुभवातील उपयुक्त बाबी महाराष्ट्रात कशा प्रभावीपणे राबविता येतील, यावर बैठकीत भर देण्यात आला. बंदर विकासासोबत रस्ते व रेल्वे कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक्स, जहाजबांधणी, मत्स्यव्यवसाय आणि किनारी पर्यटन यांची सांगड घालून किनारी भागात रोजगार व आर्थिक विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने या मॉडेलचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महाराष्ट्रातील सागरी परिसंस्था अधिक गतिमान, आधुनिक आणि उद्योगाभिमुख करण्यासाठी विविध राज्यांतील यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त बाबी महाराष्ट्रात आणण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी आंध्र प्रदेश मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण आदित्य, IAS, मुख्य अभियंता राघव राव, पोर्ट ऑफिसर कॅप्टन धर्मा, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे CEO प्रदीप पी., मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा, कार्यकारी अभियंता मनीष मेटकर यांच्यासह दोन्ही राज्यांतील वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!